प्रभात वृत्तसेवा पुणे, दि. 18 -पुणे मेट्रो प्रकल्पाच्या दुसऱ्या टप्प्यातील सहा वेगवेगळ्या मार्गांवरील 44.5 किमी मेट्रो मार्गाचा सविस्तर प्रकल्प आराखडा (डीपीआर) महामेट्रोने महापालिकेला सादर केला आहे. हा सर्व मार्ग एलिव्हेटेड असून, त्यासाठी तब्बल 12 हजार कोटींचा खर्च येणार आहे.
पुणे मेट्रो प्रकल्पांतर्गत पहिल्या टप्प्यातील स्वारगेट ते पिंपरी-चिंचवड आणि वनाज कोथरूड ते रामवाडी या दोन मार्गांचे काम अंतिम टप्प्यात आले आहे. त्यानंतर शहरातील इतरही मार्गांवर मेट्रो प्रकल्प राबविण्याची मागणी होत होती. त्यानुसार शहरातील सहा वेगवेगळ्या मार्गांवरील 44.5 किमीचा मेट्रो आणि “एचसीएमटीआर’च्या 36 किमी मार्गीका असा एकूण 82.5 किमीचा आराखडा तयार करण्याचे आदेश तत्कालीन उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी महामेट्रोला दिले होते.
त्यानुसार महामेट्रोने एचसीएमटीआर वगळता 44.5 किमीचा मेट्रोचा आराखडा तयार केला आहे. नुकताच हा आराखडा महापालिकेला सादर केला असल्याची माहिती महामेट्रोचे व्यवस्थापकिय अध्यक्ष ब्रिजेश दीक्षित यांनी पत्रकार परिषदेत दिली. हे सर्व मार्ग जमिनीवरील (एलिव्हेटेड) असून, त्यासाठी 12 हजार 15 कोटींचा खर्च येणार आहे. “एचसीएमटीआर’चा 36 किमीचा नियो मेट्रोचा आराखडाही ऑगस्ट अखेरपर्यंत महापालिकेला सादर केला जाईल, असे दीक्षित यांनी सांगितले.
असा आहे मेट्रोचा आराखडा…
वनाज ते चांदणी चौक आणि रामवाडी ते वाघोली : या दोन्हीही विस्तारित मार्गिका असून, त्यासाठी 3 हजार 357 कोटींचा खर्च अपेक्षित आहे. वनाज ते चांदणी चौक या मार्गांचे अंतर 1.12 किमी असून त्यामध्ये कोथरूड बस स्टॉप व चांदणी चौक हे दोन स्टेशन प्रस्तावित आहेत. तर रामवाडी ते वाघोली या मार्गिकेचे अंतर 11.63 किमी असून त्यामध्ये विमाननगर, सोमनाथनगर, खराडी बायपास, तुळजाभवानी, उबाळेनगर, वाघेश्वर मंदिर, वाघोली, सिध्दार्थनगर, बकोरी फाटा, विठ्ठलवाडी अशी एकूण 11 स्टेशन आहेत.
खडकवासला-खराडी : खडकवासला ते खराडी मार्गाचा आराखडा तयार करण्यात आला आहे. या मार्गाचे अंतर 25.65 किमी असून, त्यावर एकूण 22 स्टेशन आहेत. यामध्ये खडकवासला, दळवीवस्ती, नांदेड सिटी, धायरी फाटा, माणिकबाग, हिंगणे चौक, राजाराम ब्रिज, देशपांडे उद्यान, स्वारगेट, सेव्हन लव्हज चौक, पुणे कॅन्टोमेन्ट बोर्ड कार्यालय, रामटेकडी, हडपसर, मगरपट्टा, हडपसर रेल्वे स्टेशन, साईनाथनगर, खराडी चौक आदी ठिकाणी स्टेशन आहेत.
एसएनडीटी ते वारजे : या मार्गाची एकूण लांबी 6 किमी असून, त्यावर एकूण 6 स्टेशन असणार आहेत. यामध्ये पौड फाटा, कर्वे पुतळा, डहाणूकर कॉलनी, कर्वेनगर, दौलतनगर या स्टेशनचा समावेश आहे.