पहिल्या दिवशी लस घेतलेल्या लाभार्थींचे केले लसीकरण
पुणे – करोना प्रतिबंधक लसीकरणाच्या दुसऱ्या डोसचा टप्पा सुरू झाला असून, पहिल्या दिवशीच शहरात 89, तर जिल्ह्यात 525 लाभार्थींनी दुसरा डोस घेतला. दुसऱ्या डोसच्या 89 लाभार्थ्यांमध्ये 85 वर्षीय प्रसिद्ध न्युरोफिजीशियन डॉ. आर. एस. वाडिया यांचाही समावेश होता.
करोना प्रतिबंधक लसीकरणाच्या दुसऱ्या डोसचा टप्पा सोमवारपासून सुरू झाला. ज्यांनी पहिला डोस घेतला आहे, त्यांची खातरजमा करून त्यांना दुसरा डोस देण्यात आला. दरम्यान, डॉ. वाडिया यांनी रुबी हॉल क्लिनिक येथे लसीचा दुसरा डोस घेतला. त्यानंतर त्यांना अर्धा तास निरीक्षणाखाली ठेवण्यात आले. “आपला देश आणि जगाला सुरक्षित ठेवण्यासाठी प्रत्येकाने संकोच न करता ही लस घेतली पाहिजे. ही लस करोनासारख्या रोगांवर अतिशय उपयुक्त ठरली आहे,’ अशी प्रतिक्रिया डॉ. वाडिया यांनी दिली.
दरम्यान, दुसऱ्या डोसचे लसीकरण 13 फेब्रुवारीपासून सुरू होणार होते, परंतु ते दोन दिवस पुढे ढकलण्यात आले. राज्य आरोग्य विभागाच्या आदेशानुसार सोमवारपासून लसीकरण सुरू केल्याची माहिती, रुबी हॉल क्लिनिकच्या मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. मनीषा करमरकर यांनी दिली.
कमला नेहरू रुग्णालयात पहिल्या दिवशी म्हणजे 16 जानेवारी रोजी 74 वर्षीय डॉ. विनोद शहा यांनी लस घेतली होती. त्यांनी 15 फेब्रुवारी रोजी दुसरा डोस घेतला. “मधुमेह आणि अस्थम्याचा त्रास आहे. पण, पहिल्या आणि दुसऱ्या डोसचा अजिबात कोणताही साइड इफेक्ट झाला नाही,’ अशी प्रतिक्रिया
डॉ. शहा यांनी दिली.