नवी दिल्ली – जयपूर येथील इथल्या खादीच्या नैसर्गिक रंगाच्या नव्या स्वयंचलित विभागाचे उद्घाटन लघू उद्योग मंत्री नितीन गडकरी यांनी केले. गाईच्या शेणापासून तयार केलेला हा देशातील पहिला रंग आहे. देशातील ग्रामीण आणि कृषी आधारीत अर्थव्यवस्थेला यामुळे मोठी चालना मिळेल असे ते यावेळी म्हणाले. या यशस्वी संशोधनासाठी त्यांनी खादी ग्रामोद्योग आयोगाचे कौतुक केले.
गडकरी यांनी स्वतःला खादीच्या नैसर्गिक रंगाचा ब्रॅंड अँबेसेडर घोषित केले. देशभरात या रंगाचा प्रचार ते करणार असून, गाईच्या शेणापासून रंगनिर्मितीसाठी तरुण उद्योजकांना प्रोत्साहन देणार असल्याचे ते म्हणाले.
गडकरी यांनी यावेळी 1000 लीटर खादी नैसर्गिक रंगाची (प्रत्येकी 500 लीटर डिस्टेंपर आणि 500 लीटर इमल्शन) मागणी नोंदवली. नागपूरच्या निवासस्थानी ते याचा उपयोग करणार आहेत. याआधी प्रायोगिक स्वरुपात मनुष्यबळाचा वापर करुन नैसर्गिक रंग तयार केला जात होता. या नव्या प्रकल्पामुळे नैसर्गिक रंगाची उत्पादन क्षमता दुप्पटीने वाढणार आहे. सध्याचे दिवसाला होणारे 500 लीटर उत्पादन 1000 लीटर होईल. नवा प्रकल्प अत्याधुनिक तंत्रज्ञान आणि यंत्रणेने सुसज्ज आहे. उत्पादनाचा सर्वोत्तम दर्जा राखला जाईल.
खादी नैसर्गिक रंगाचे उद्घाटन गडकरी यांनी 12 जानेवारी रोजी केले होते. शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढवणे आणि देशभरात स्वयंरोजगार निर्माण करणे या दुहेरी उद्देशाने या रंग निर्मितीला सुरुवात केली होती. या अभिनव उपक्रमाचा अधिकाधिक लोकांना लाभ व्हावा या उद्देशाने खादी ग्रामोद्योग आयोगाने या प्रकल्पाचा समावेश पंतप्रधान रोजगार निर्मिती कार्यक्रमा अंतर्गत केला आहे.