जयपुर – आधुनिक काळात पर्यावरण पूरक व्यवसायांना महत्त्व देण्यात येत आहे. अशाच प्रकारचे एक अनोखे उदाहरण जयपूरची जागृती या मुलीने समोर आणले आहे. जागृती गेल्या चार वर्षापासून आपल्या पित्याच्या सहकार्याने गाईच्या शेणापासून डायरी, कॅलेंडर, पुस्तके आणि मास्क अशा प्रकारची विविध उत्पादने तयार करण्यास प्रारंभ केला असून तिच्या या उत्पादनांना चांगला प्रतिसाद मिळत आहे.
जयपूरमध्ये राहणारे भिमराज शर्मा आणि त्यांची मुलगी जागृती यांनी गेल्या चार वर्षांच्या कालावधीत शेणापासून विविध प्रकारची उत्पादने तयार केली असून ती बाजारपेठेत आणली आहेत. उत्पादने केवळ भारताच्या विविध भागातच नव्हे तर परदेशातही जात आहेत. पन्नास वर्षे वयाचे भीमराज शर्मा जयपूरमध्ये गेल्या वीस वर्षांपासून प्रिंटिंग प्रेसचे काम पाहत आहेत. भिमराज शर्मा आणि जागृती या दोघांनाही गायीविषयी विशेष प्रेम आहे.
त्यातूनच त्यांनी पंचगव्य या विषयात डिप्लोमाचे शिक्षण घेतले आणि त्यानंतर त्यांच्या डोक्यात गाईच्या शेणाचा वापर विविध उत्पादने करण्यासाठी करता येईल का याबाबत कल्पना आली आणि त्यांनी ती प्रत्यक्षात आणली. साध्या गाईने दूध देणे थांबवले तरी ती शेण मात्र कायमस्वरूपी देत असतात.
त्या शेणाचाच वापर करून आपला व्यवसाय वाढविण्याचा निर्णय या दोघांनी घेतला. प्रथम त्यांनी हॅंडमेड पेपरचे उत्पादन केले. ते उत्पादन यशस्वी झाल्यानंतर त्यांनी त्याचा वापर करून इतर अनेक उत्पादने बाजारपेठेत आणली. त्यांनी आपल्या या अनोख्या स्टार्ट अपला गोकृती असे नाव दिले आहे.