नवी दिल्ली : भारतात कोरोनाची दुसरी लाट सर्वत्र धुमाकूळ घालत आहे. देशातील प्रत्येक राज्यात कोरोनाचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात होताना दिसत आहे. दरम्यान, या कोरोनाला रोखण्यासाठी डॉक्टर्स दिवसरात्र एक करून रुग्णांची सेवा करत आहे. मात्र काही दिवसांपासून कोरोनाला पळवून लावण्यासाठी आणि प्रतिकारशक्ती वाढण्यासाठी अजब थेरपीचा प्रयोग करण्यात येत आहे. गाईच्या शेणापासून माणसाच्या शरीरातील प्राकारशक्ती वाढवता येऊ शकते असे सांगण्यात येत आहे, गुजरातमध्ये अशा प्रकारचा शोध लावण्यात आला आहे तसेच त्याचा प्रयोग इथल्या एका गोशाळेत करण्यात येत आहेत. मात्र आता या थेरपीवर भारतीय डॉक्टर्सनी गंभीर इशारा दिला आहे.
नागरिकांच्या मनात कोरोनाची एवढी भीती बसली आहे कि त्यांना सांगण्यात येणाऱ्या कोणत्याही गोष्टी करण्यासाठी लोक तयार असल्याचे दिसत आहे.असाच प्रकार गाईच्या शेणाचा लेप शरीराला लावल्याने प्रतिकारशक्ती वाढत असल्याचे सांगण्यात येत आहे. मात्र डॉक्टरांनी या असा प्रयोगाला कोणताही वैज्ञानिक आधार नसल्याचे म्हटले आहे. त्यामुळे कोणीही असा प्रयोग करू नये असे म्हटले आहे. उलट संपूर्ण अंगाला शेण लावल्यामुळे दुसरे आजार होण्याची भीती देखील डॉक्टरांनी व्यक्त केली आहे.
गुजरातमध्ये मागच्या आठवड्यात श्री स्वामीनारायण गुरुकुल विश्वविद्या प्रतिष्ठानमध्ये काही लोकांनी एका गोशाळेत जाऊन गाईचे शेण आणि गोमूत्र आपल्या संपूर्ण शरीराला लावले होते. त्यांचा विश्वास होता कि असे केल्याने त्यांना कोरोना होणार नाही आणि त्यांच्या शरीरातील प्रतिकारशक्ती वाढण्यास मदत होणार आहे. मात्र अशा कोणत्याही थेरपीने कोरोना पळून जात नाही याला कोणताही वैज्ञानिक आधार नसल्याचे डॉक्टरांनी म्हटले आहे. तसेच भारत आणि जगभरातील डॉक्टर आणि वैज्ञानिकांनी कोरोनाच्या पर्यायी उपचारांचा सराव करण्याबद्दल वारंवार इशारा देत आहेत, असे कोणतेही प्रयोग करू नका कारण तसे केल्याने आरोग्याच्या समस्या होऊ शकतात.
दरम्यान, देशात कोरोनाचे आतापर्यंत 22.66 दशलक्ष रुग्ण आढळून आले आहेत. तसेच 2,46,116 मृत्यू नोंदले गेले आहेत. देशातील अनेक राज्यांमध्ये परिस्थिती हाताबाहेर जात आहे त्यामुळे तिथे लॉकडाऊन घोषित करण्यात आला आहे. तर कुठे कडक निर्बध लादण्यात आले आहेत.