नवी दिल्ली – जूनमधे 92,849 कोटी रुपयांची सकल वस्तु आणि सेवा कर-जीएसटीची महसुल वसुली झाली आहे. यात सीजीएसटी 16,424 कोटी रुपये, एसजीएसटी 20,397 कोटी रुपये आणि आयजीएसटी 49,079 कोटी रुपये, आणि उपकर 6,949 कोटी रुपये यांचा समावेश आहे. कोविड महामारीच्या दुसऱ्या लाटेच्या पार्श्वभूमीवर करदात्यांना मे-2021 साठी परतावा भरण्याकरता 15 दिवसांच्या विलंबासह व्याजात सूट/व्याजासंदर्भात विविध सवलती दिल्या होत्या.
जून 2021 ची महसुल वसूली गेल्या वर्षीच्या या महिन्यातील महसुल वसुलीपेक्षा 2 टक्के अधिक आहे. जीएसटी महसुल सलग आठ महीने 1 लाख कोटी रुपयांच्या वर राहिल्यानंतर जून 2021 मधे तो 1 लाख कोटी रुपयांच्या खाली आला आहे. मे 2021 दरम्यान बहुतांश राज्ये कोविडमुळे पूर्ण किंवा अंशत: बंद होते. मे 2021 महीन्यातील ई-वे बिल डेटा पाहिला असता लक्षात येते की एप्रिल 2021 मधील 5.88 कोटींच्या तुलनेत मे महीन्यात 3.99 कोटी ई-वे बिल तयार झाले, जे 30% हून कमी आहे.
एप्रिल 2021च्या पहिल्या दोन आठवड्यात दिवसाला सरासरी 20 लाख ई-वे बिल तयार होत होते. एप्रिलच्या शेवटच्या आठवड्यात ते घटून 16 लाख आणि 9 ते 22 मे दरम्यान दोन आठवड्यात आणखी घट होऊन 12 लाख झाले. यानंतर ई-वे बिल तयार होण्याची सरासरी वाढत असून 20 जून पासून सुरु होणार्या आठवड्यात ती पुन्हा 20 लाखाच्या पातळीवर पोहचली आहे. त्यामुळे जून महीन्यात जीएसटी महसुलात घट दिसून आली असली तरी जुलै 2021 पासून जीएसटी महसुलात पुन्हा वाढ दिसेल अशी आशा व्यक्त केली जात आहे.