नवी दिल्ली – ऊर्जा वापरविषयक स्टार लेबलिंगमुळे नवीन वर्षात फॅनच्या किमती 8 ते 20 टक्क्यांनी वाढणार आहेत. ब्युरो ऑफ एनर्जी एफिशियन्सी या संस्थेने फॅनसाठी ऊर्जा वापरविषयक स्टार लेबलिंग एक जानेवारीपासून बंधनकारक केले आहे. फॅन वर एक स्टार असेल तर तीस टक्के ऊर्जा बचत होते. तर पाच स्टार असतील तर 50% ऊर्जा बचत होते असे समजले जाते.
भारतातील फॅन निर्माण करणाऱ्या कंपन्यांनी सरकारच्या या निर्णयाचे स्वागत केले आहे. मात्र ऊर्जा कार्यक्षम मोटारी आणि इलेक्ट्रॉनिक उपकरणाची आयात करावी लागते. त्यामुळे त्यांच्या किमती 5 ते 20 टक्क्यांनी वाढतील असे सांगण्यात आले. आता फॅन निर्माण करणाऱ्या कंपन्यांना फोनवर स्टार रेटिंग नमूद करावे लागणार आहे. ओरिएंट इलेक्ट्रिकचे व्यवस्थापकीय संचालक राकेश खन्ना यांनी सरकारच्या या निर्णयाचे स्वागत केले. यामुळे भारतातील ग्राहकांना दर्जेदार फॅन उपलब्ध होणार आहेत. त्याचबरोबर ऊर्जेची बचत होणार आहे.
मात्र यासाठी नव्या यंत्रसामग्रीत गुंतवणूक करावी लागणार आहे त्यामुळे उत्पादन खर्च वाढणार आहे. भारतातील ग्राहक एकूण वीज वापरात 20% वीज फॅन साठी वापरतात. आता फॅनसाठी कमी विज लागणार आहे. त्यामुळे ग्राहकांची बचत होणार आहे.
त्याचबरोबर वीज निर्मिती करणाऱ्या कंपन्यांना कमी ताण येणार आहे. उषा इंटरनॅशनलचे मुख्य कार्यकारी अधिकारी दिनेश छाब्रा यांनी सांगितले की, एक स्टार असलेल्या फॅनची किंमत पाच ते सात टक्क्यांनी वाढेल. तर पाच स्टार असलेल्या फॅनची किंमत 20 टक्क्यापर्यंत वाढेल.
भारतात फॅनची 10 हजार कोटीची बाजारपेठ आहे. भारतामध्ये सर्वसाधारणपणे 200 कंपन्या फॅन तयार करतात आणि या कंपन्यांनी इंडियन फॅन मॅन्युफॅक्चरर्स असोसिएशन नावाची संघटना स्थापन केली आहे. आता खेड्यात आणि छोट्या शहरातही फॅनचा वापर वाढत आहे. कारण सरकारने केलेल्या नव्या सूचनेमुळे फॅन वापरणारे ग्राहक ऊर्जा संवर्धनाबाबत संवेदनाशील होतील असे सांगण्यात आले.