मुंबई – मराठमोळा अभिनेता प्रसाद ओकने (Prasad Oak) अभिनयासह दिग्दर्शन क्षेत्रातही यश मिळवले आहे. मालिकांसह त्याने अनेक चित्रपटांमध्ये काम केले आहे. आनंद दिघे यांच्या जीवनावर आधारित ‘धर्मवीर’ चित्रपटात त्याने उत्तम भूमिका साकारली. या चित्रपटातील त्याच्या भूमिकेचे सर्वत्र कौतुक देखील झाले होते. त्याच्या उत्तम अभिनय कौशल्यामुळे त्याचा मोठा चाहता वर्ग निर्माण झाला आहे. नुकतेच प्रसाद ओकने त्याला आलेल्या त्याच्या चाहत्याच्या अनुभवाबाबत सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर केली आहे.
प्रसाद ओक पोस्ट –
इनस्टाग्रामवर शेअर केलेल्या पोस्टमध्ये प्रसादने लिहिले आहे की, “आज अचानक पॅकअप नंतर कपडेपट करणारा आमचा संतोष जगताप व्हॅनिटी वॅनमध्ये आला आणि म्हणाला, “दादा… माझे काही मित्र पंढरपुरातून इथे सांगलीत स्पेशल गाडी करुन फक्त तुला भेटायला आलेत… त्यांना 5 मिनिटं देशील का?” मी म्हटलं बोलाव… त्यानंतर नवनाथ गायकवाड आणि त्यांचे 2/3 मित्र अशी काही मंडळी आली… काही कळायच्या आत एकाने मला फेटा बांधला… दुसऱ्याने गळ्यात हार घातला… आणि तिसऱ्याने म्हणजे नवनाथ नी ही सुंदर मूर्ती माझ्या हातात ठेवली… आणि सगळे जाऊ लागले… मी म्हणालो. “एवढ्याचसाठी आला होतात?” त्यावर ते म्हणाले “हो दादा… वाटलं ही मूर्ती तुमच्या हातात द्यावी.. बास..” आणि सगळे क्षणार्धात… मला आभार मानण्याची संधीही न देता निघून गेले…”
View this post on Instagram
पुढे प्रसाद म्हणाला की, “मला खरंच कळत नाही कधी कधी की या अशा निर्लेप, निखळ, निरपेक्ष प्रेमाचं उतराई कसं व्हायचं? या जिव्हाळ्याचं, या आपुलकीचं काय करायचं? सध्या चालू असलेलं काम म्हणजे खरोखरच एक “अवघड वाट” आहे… पुढच्या कामांचंही मनात दडपण आहे… अशा वेळी कुठं चुकलो तर? म्हणून मला “संगत” द्यायला आला असावा की काय तो? या अशाच भांबावलेल्या आणि भारावलेल्या अवस्थेत मी त्या मूर्तीकडे पाहिलं आणि त्या क्षणी “धर्मवीर” मध्यले आमच्या संगीता ताई बर्व्यांनी लिहिलेले शब्द आठवले. ”
“संगतीनं ओलांडला अवघड घाट…चुकलो जिथं मी तिथं दाविली तू वाट…तुझ्यामुळं उमगलो मीच मला थेट… सुख दुःख एका मेका वाटलं वाटलं…. भेटला विठ्ठल माझा भेटला विठ्ठल…!!!” या पोस्टसह त्याने दोन फोटो देखील शेअर केले आहेत. यातील एका फोटोमध्ये विठ्ठलाची मूर्ती दिसत आहे. तर दुसऱ्या एका फोटोमध्ये प्रसादने हातात विठुरायची मूर्ती घेतलेली दिसत आहे.