बेल्हे (रामदास सांगळे) – श्री क्षेत्र आणे (ता.जुन्नर) येथे पौष शुद्ध प्रतिपदा व व्दीतीय या तिथींना श्री रंगदास स्वामी महाराजांचा पुण्यस्थिती सोहळा संपन्न झाला असून शनिवार दि. 24 व 25 या दोन दिवसांत 1 लाख भाविकांनी यात्रेला उपस्थिती लावली असल्याची माहिती अध्यक्ष विनायक आहेर यांनी दिली.
यासाठी आमटी बनवण्यासाठी सुमारे 1 लाख रुपयांचा मसाला व तूरडाळ लागली. यांची अनुक्रमे पहिल्या 20 व दुसऱ्या दिवशी 20 अशा 40 कढया आमटी तयार करण्यात आली. आणि 65 क्विंटल बाजरीच्या भाकरी घरोघरी तयार करून अगदी वाजत-गाजत मिरवणुकीने देवस्थानच्या आवारात आणण्यात आल्याची माहिती देवस्थानचे अध्यक्ष विनायक आहेर यांनी दिली.
महाराष्ट्रातीलच नव्हे तर देशाच्या कानाकोपऱ्यातून भाविक या आमटी महाप्रसादाचा लाभ घेण्यासाठी येतात. यात्रा कमिटीने गावातील चौकाचौकात सीसीटीव्ही कॅमेरा बसवून खिसेकापूंवर नियंत्रण ठेवले असल्याची माहिती उपाध्यक्ष अनिल आहेर यांनी दिली. याप्रसंगी जुन्नरचे तहसिलदार रविंद्र सबनीस,आमदार अतुल बेनके, आशाताई बुचके, पांडुरंग पवार, भेट देवून सर्व भाविकांनी गर्दी न करता आमटी-भाकरी महाप्रसादाचा लाभ घ्यावा असे आवाहन केले.
सुमारे एक लाख भाविकांनी या दोन दिवसांत श्री स्वामींचे दर्शन घेऊन महाप्रसादाचा लाभ घेतला. यावेळी पुणे जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष पांडुरंग पवार यांनी देवस्थानला ‘ब’ वर्ग दर्जा राज्यशासनाकडून प्राप्त झाल्याची माहिती दिली. या दोन दिवशी आमटी भाकरी महाप्रसाद वितरणासाठी सरदार पटेल हायस्कूल, प्राथ. व पोस्ट बेसिक आश्रमशाळा आणि समर्थ इंजिनिअरींग कॉलेज बेल्हे, मातोश्री प्रतिष्ठान, कर्जुले हर्या येथील विद्यार्थ्यांनी सेवा दिली. हा यात्रा उत्सवाचा स्वच्छ अगदी नियोजनबद्ध पार पडला असल्याची माहिती अध्यक्ष विनायक आहेर यांनी दिली.