Asia Cup 2023 Afghanistan vs Sri Lanka : अफगाणिस्तान संघाचं सुपर 4 मध्ये पोहचण्याचं स्वप्न अवघ्या 2 धावांनी भंगलं आहे. अतितटीच्या सामन्यात श्रीलंकेने अफगाणिस्तानवर अवघ्या 2 धावांनी विजय मिळवत सुपर 4 मध्ये धडक मारली आहे.
हा सामना अतिशय रोमांचक होता. सुपर फोरमध्ये पोहोचण्यासाठी अफगाणिस्तानला हा सामना 37.1 षटकांत जिंकावा लागणार होता. 292 धावांचा पाठलाग करताना अफगाण संघाने 37 षटकांत 8 बाद 289 धावा केल्या होत्या. शेवटच्या चेंडूवर विजयासह अफगाणिस्तानला सुपर फोर गाठण्यासाठी तीन धावांची गरज होती, पण मुजीब झेलबाद झाला. पुढे आलेला फारुकीही LBW बाद झाला आणि अफगाणिस्तानने सामना दोन धावांनी गमावला, तर एक षटक आधी अफगाण संघ सुपर फोर गाठण्याच्या जवळ दिसत होता.
श्रीलंकेने अफगाणिस्तानवर दोन धावांनी मात करत आशिया चषकाच्या सुपर फोरमध्ये प्रवेश केला आहे. कुसल मेंडिसच्या 92 धावांच्या जोरावर श्रीलंकेने प्रथम फलंदाजी करताना 291 धावा केल्या. प्रत्युत्तरात अफगाणिस्तानचा संघ 37.4 षटकात 289 धावांवर ऑलआऊट झाला आणि दोन धावांनी सामना गमावला. धनंजया डी सिल्वाने सामन्याच्या शेवटच्या षटकात दोन बळी घेत श्रीलंकेला रोमहर्षक विजय मिळवून दिला.
अफगाणिस्तानकडून मोहम्मद नबीने 32 चेंडूत 65 धावांची शानदार खेळी केली पण ही खेळी व्यर्थ ठरली. अफगाणिस्तानकडून गोलंदाजीत गुलबदिन नायबने चार, रशीद खानने दोन आणि मुजीबने एक गडी बाद केला. श्रीलंकेकडून गोलंदाजीत कसून राजिताने चार, धनंजय डी सिल्वा आणि दुनिथ वेललागेने प्रत्येकी दोन गडी बाद केले. तिक्ष्णा आणि पाथिराना यांना प्रत्येकी एक विकेट मिळाली.
या विजयासह श्रीलंकेचा संघ आशिया कपच्या सुपर फोरमध्ये पोहोचला आहे. श्रीलंकेशिवाय भारत, पाकिस्तान आणि बांगलादेशने सुपर फोरमध्ये स्थान मिळवले आहे.