चर्चेत – दहशतीच्या छायेत श्रीलंका

मनोज जोशी

इस्लामी कट्टरवादाचा प्रभाव दक्षिण आणि आग्नेय आशियामध्ये वाढत आहे. श्रीलंकेतील एनटीजे ही दहशतवादी संघटना फारशी घातक म्हणून कधीच ओळखली जात नाही. परंतु अशा संघटनेचा आडोसा घेऊन आयएससारख्या आंतरराष्ट्रीय संघटनेने श्रीलंकेतील बॉम्बस्फोट घडवून आणले असावेत, असा पहिला अंदाज बांधला गेला. या पार्श्‍वभूमीवर सर्व आंतरराष्ट्रीय संदर्भ जोडून श्रीलंकेतील घडामोडींकडे पाहायला हवे.

श्रीलंकेत रविवारी झालेल्या हल्ल्यात सुमारे 300 लोकांना प्राण गमवावे लागले असून, 500 पेक्षा जास्त लोक जखमी आहेत, यावरूनच श्रीलंकेतील बॉम्बस्फोटांच्या तीव्रतेचा अंदाज येतो. श्रीलंकेतील सरकारने संपूर्ण बेटावर संचारबंदी जाहीर केली असून, आगामी काही दिवसांत आणखी हल्ले होऊ शकतात, अशी गोपनीय माहिती मिळत असल्यामुळे संपूर्ण देशात अतिदक्षतेचा इशारा दिला आहे. त्याचप्रमाणे दुसरीकडे संभाव्य हल्ल्यांसंदर्भात अफवाही पसरविल्या जात असल्यामुळे नागरिक भेदरले आहेत.

पोलिसांनी अफवा खोट्या असल्याचे सांगितले आहे. अर्थात, बंदरनायके आंतरराष्ट्रीय विमानतळाजवळ एक इम्प्रोवाइज्ड एक्‍सप्लोजिव्ह डिव्हाइस (आयईडी) सापडले असून, ते नष्ट करण्यात यश आले आहे. राष्ट्रपती मैत्रीपाला सिरिसेना सिंगापूर आणि भारताच्या दौऱ्यावर होते. परंतु या घटनेमुळे दौरा रद्द करून ते श्रीलंकेत पोहोचले आणि देशात आणीबाणी जारी केली. या स्फोटांच्या तपासासाठी त्यांनी त्रिसदस्यीय समिती नियुक्‍त केली आहे.

स्फोट कुणी घडविले, याबाबत सुरुवातीचे काही तास अनिश्‍चिततेत गेल्यानंतर या घटनांमागे नॅशनल तौहिद जमात (एनटीजे) या संघटनेचा हात असल्याचा दावा राजिता सेनरत्ने या मंत्र्यांनी केला. याप्रकरणी ज्या लोकांना अटक करण्यात आली आहे, ते सर्वजण स्थानिक आहेत. अर्थात, या व्यक्‍तींचा देशाबाहेरील कुणाशी संपर्क होता किंवा कसे, याबाबत अद्याप माहिती मिळू शकलेली नाही, असे ते म्हणाले. पकडले गेलेले लोक कोण आहेत आणि त्यांचा संबंध कोणत्या संघटनेशी आहे, याबाबत पोलिसांनीही गोपनीयता बाळगली आहे. सेनरत्ने यांनी या हल्ल्यास गुप्तचर यंत्रणेची विफलता कारणीभूत ठरल्याचे म्हटले आहे. कारण परदेशी सूत्रांकडून अशा प्रकारच्या हल्ल्याची शक्‍यता असल्याची गुप्तवार्ता मिळाली होती. परंतु स्थानिक पोलिसांना ती 9 एप्रिलला सांगितली गेली. त्याचप्रमाणे संशयास्पद व्यक्‍तींची नावे वरिष्ठ स्तरापर्यंत सर्वांना सांगण्यात आली.

11 एप्रिलला पोलीस उपमहानिरीक्षक प्रियालाल दासनायके यांनी कोलंबोमधील हॉटेलांत, चर्चेसमध्ये तसेच भारतीय दूतावासावर बॉम्बहल्ल्यांची शक्‍यता असल्याचा इशारा जारी केला होता. त्यांनी सांगितले होते की, या हल्ल्यांचे संचालन एनटीजेचा म्होरक्‍या मोहंमद जरहान करेल. कदाचित या इशाऱ्यानंतर व्हीआयपी विभागातील सुरक्षा व्यवस्था कडक केलीही असेल; परंतु ईस्टरचा पवित्र सण साजरा होत असताना चर्च आणि हॉटेल्स अशा वर्दळ वाढलेल्या ठिकाणी मात्र काहीही उपाययोजना केल्या गेल्या नाहीत.

वास्तविक, श्रीलंकेत सत्तेसाठी सुरू असलेल्या चढाओढीत समस्येचे मूळ आहे. राष्ट्रपती आणि पंतप्रधान यांच्यात अजिबात ताळमेळ उरलेला नाही. पत्रकार परिषदेत सेनरत्ने यांनी सांगितले की, दासनायके यांनी दिलेल्या इशाऱ्याबद्दल पंतप्रधान रानिल विक्रमसिंघे यांना काहीच कल्पना देण्यात आली नव्हती. एवढेच नव्हे तर सुरक्षा परिषदेच्या बैठकीपासूनही त्यांना दूर ठेवण्यात आले होते. या स्फोटांमागे स्थानिक शक्‍तींचा हात असल्याचे श्रीलंकेतील पोलिसांकडून सांगितले जात असले, तरी स्फोटांची भीषणता पाहिल्यास एखाद्या मोठ्या आंतरराष्ट्रीय गटाचा, विशेषतः आयएससारख्या संघटनेचा हात यामागे असावा, असा संशय अनेकांना आहे. श्रीलंकेच्या एकूण लोकसंख्येत 70.2 टक्‍के बौद्ध, 12.6 टक्‍के हिंदू, 9.7 टक्‍के मुस्लीम आणि 7.4 टक्‍के वाटा ख्रिश्‍चन लोकसंख्येचा आहे. श्रीलंकेने हिंदू आणि बौद्ध अशा दोन्ही कट्टरपंथीयांचा अनुभव घेतला आहे. परंतु मुस्लिमांनी शांतता राखली होती. अर्थात मुस्लिमांमध्येही काही कट्टरपंथी गट आहेत. 2016 मध्ये श्रीलंकेच्या संसदेत असे सांगितले गेले होते की, देशातील चांगल्या शिकल्या-सवरलेल्या कुटुंबातील सुमारे 32 टक्‍के मुस्लीम इस्लामिक स्टेट या कट्टरपंथी संघटनेत सामील झाले आहेत.

एनटीजे ही फारशी ज्ञात संघटना नाही. या संघटनेला दहशतवादाचा फारसा इतिहास नाही. गेल्यावर्षी एका बौद्ध प्रतिमेचे नुकसान करण्यात या संघटनेचा सहभाग होता आणि संघटनेचा सचिव अब्दुल रजिक याला वांशिक भावना भडकावणारे भाषण केल्याबद्दल अटक झाली होती. अर्थात, जागतिक स्तरावरील अनेक इस्लामी आंदोलनांमध्ये एनटीजेने सहभाग नोंदवला असून, जगभरात इस्लाम कट्टरतावादाचा प्रसार करू पाहणाऱ्या संघटनांना मदतही केली आहे. त्यामुळेच एनटीजेमध्ये आयएससारख्या काही अतिकडव्या आंतरराष्ट्रीय दहशतवादी संघटनांनी घुसखोरी केली असल्याचा संशय आहे. अशा संघटनांनीच एनटीजेचा आडोसा घेऊन श्रीलंकेतील स्फोट घडवून आणले असावेत, असा अंदाज व्यक्‍त करण्यात येत आहे. योगायोगाने तमिळ तौहिद जमात नावाची एक संघटनाही अस्तित्वात आहे. तीही इस्लामी संघटना असून, या संघटनेकडून केवळ सामाजिक उपक्रमच राबविले जातात.

सीरियामध्ये इस्लामिक स्टेट्‌सचा पाडाव झाल्यानंतर सीरियातून परतलेल्या कट्टरपंथीयांकडून अन्यत्र कारवाया सुरू केली जाण्याची धास्ती अनेक देशांना आहे. मालदिवसारख्या देशांमध्ये सीरियातून परतलेल्या कट्टरपंथीयांचा धोका उद्‌भवू शकतो. मे 2017 मध्ये फिलिपीन्स सरकारने मारवी शहराला इस्लामी कट्टरवाद्यांच्या तावडीतून सोडविण्यासाठी पाच महिने लष्करी कारवाई केली होती. तेव्हापासून इंडोनेशियातील अनेक चर्चमध्ये बॉंबस्फोट झाले आहेत. त्यामुळेच या क्षेत्रातील देशांनी दहशतवादाचा निःपात करण्यासाठी परस्पर सहकार्य वाढविण्यास सुरुवात केली आहे. या सर्व पार्श्‍वभूमीवर श्रीलंकेतील बॉंबस्फोटांकडे पाहायला हवे.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.