जैसलमेर – पाकिस्तानी गुप्तहेर संस्था आयएसआयच्या इशाऱ्यावरुन, पाकिस्तानातून वैध पासपोर्ट आणि व्हिसावर भारतात आलेल्या आणि जैसलमेरमधील भारतीय लष्कराची गोपनीय माहिती पाकिस्तानला पाठवल्याच्या आरोपावरून मुख्य महानगर दंडाधिकारी न्यायालयाने एक पाकिस्तानी नागरिक आणि त्याच्या दोन साथीदारांना जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे. या शिक्षेमध्ये सात वर्षांचा सश्रम कारावास, त्यानंतर पुन्हा दोन वर्षांचा सश्रम कारावास आणि प्रत्येकी 10,000 रुपये दंड ठोठावण्यात आला आहे.
अतिरिक्त पोलीस गुप्तचर महासंचालकांनी सांगितले की, नंदलाल उर्फ महाराज नरसिंग, पाकिस्तानच्या सांगड जिल्ह्यातील खिंप्रो येथील रहिवासी आहे. तो वैध पासपोर्ट आणि व्हिसा घेऊन जोधपूरला आला होता. मग जैसलमेरमध्ये पोहोचल्यानंतर आयएसआयच्या सांगण्यावरून भारतीय लष्कराची गोपनीय माहिती गोळा करून तो पाकिस्तानला पाठवत होता.
20 ऑगस्ट 2016 रोजी सीआयडी इंटेलिजन्सच्या टीमने पाकिस्तानी गुप्तहेर नंदलाल महाराज याला ऑफिशियल सिक्रेट्स ऍक्ट आणि फॉरेनर्स ऍक्टच्या कलमांखाली अटक केली होती. तपासादरम्यान, नंदलालला हेरगिरीत मदत केल्याबद्दल गौरी शंकर आणि प्रेमचंदचा मुलगा खेमचंद या दोन पाकिस्तानी नागरिकांना अटक करण्यात आली.
खबरी असलेले दोन्ही भाऊ पाकिस्तानातील सांगड जिल्ह्यातील खिंप्रो भागातील रहिवासी आहेत. पाकिस्तानातून लॉंग टर्म व्हिसावर भारतात आल्यानंतर दोघेही जोधपूरच्या हाऊसिंग बोर्ड परिसरातील हरिनगर आणि शंकर नगरमध्ये वेगवेगळ्या घरात राहत होते. तपासानंतर सीआयडी इंटेलिजन्सने 16 नोव्हेंबर 2016 रोजी मुख्य महानगर दंडाधिकारी जयपूर महानगर यांच्या न्यायालयात या तीनही आरोपींविरुद्ध आरोपपत्र सादर केले.
सुनावणीत तिन्ही आरोपींना ऑफिशियल सिक्रेट्स ऍक्टच्या कलमांतर्गत दोषी आढळल्यानंतर सात वर्षांची शिक्षा सुनावण्यात आली. आरोपी गौरीशंकर आणि प्रेमचंद यांना कलम 10 मध्ये दोषी आढळून एक वर्ष सश्रम कारावास आणि आरोपी नंदलाल याला परदेशी कायद्याच्या कलमांतर्गत दोषी आढळल्याने दोन वर्षे सक्तमजुरी आणि 10 हजार रुपये दंडाची शिक्षा ठोठावण्यात आली.