पुणे विद्यापीठ प्रशासनाची दिरंगाई : काम रखडलेलेच, दिलेली मुदत दीड वर्षांपूर्वीच संपली
प्रशासनाने त्वरित पावले उचलावीत : विद्यार्थ्यांची मागणी
पुणे – सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या क्रीडा संकुलाच्या कामास दिरंगाई होत आहे. सुमारे दीड वर्षापूर्वीच क्रीडा संकुलाचे काम पूर्ण होणे अपेक्षित असताना अजूनही त्याचे काम संथगतीने सुरू आहे. आंतरराष्ट्रीय दर्जाची सुविधा असलेल्या क्रीडा संकुलात विद्यार्थ्यांना सहभागी होता येण्यासाठी विद्यापीठ प्रशासनाने त्वरित पावले उचलावीत, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.
विद्यापीठाच्या आवारात तब्बल 27 एकराच्या परिसरात अद्ययावत क्रीडा संकुल उभारण्यात येत आहे. त्याचे उद्घाटन दि. 8 फेब्रुवारी 2016 रोजी तत्कालीन कुलगुरू डॉ. वासुदेव गाडे यांच्या हस्ते झाले होते. क्रीडा संकुल उभारण्यास संबंधितांना तीन वर्षांचा कालावधी देण्यात आला होता. मात्र, त्याचे काम पूर्णत्वास आले नाही. या संकुलासाठी विद्यापीठ अनुदान आयोगाकडून 1 कोटी 60 लाखांचा निधी मंजूर झाला आहे.
अद्ययावत क्रीडा संकुलासाठी आणखी किती दिवस प्रतीक्षा करावी लागेल, असा प्रश्न विद्यार्थ्यांतून उपस्थित होत आहे. उद्घाटन रखडल्याने ऍथलेटिक ट्रॅकला “ब्रेक’ क्रीडा संकुलातील ट्रॅकसाठी राष्ट्रीय उच्चतर शिक्षा अभियान अर्थात “रूसा’कडून 5 कोटींचा निधी मंजूर झाला आहे. त्यातून आंतरराष्ट्रीय दर्जाचा “ऍथलेटिक ट्रॅक’ पूर्ण झाला आहे. हा दर्जा “श्री शिवछत्रपती क्रीडा संकुल’ येथील ट्रॅकपेक्षा चांगला आहे. या “सिंथेटिक ट्रॅक’वर ऍथलेटिक प्रकारातील सर्व खेळ खेळण्याची सोय आहे. तसेच, या ट्रॅकच्या मध्यभागी फूटबॉल ग्राउंडचेदेखील काम पूर्ण झाले आहे. हा सिंथेटिक ट्रॅक पूर्ण होऊनही केवळ उद्घाटनाअभावी त्याचा वापर होत नाही.
इनडोअर स्टेडियम अंतिम टप्प्यात
इनडोअर स्टेडियमचे काम शेवटच्या टप्प्यात असून, त्याच काम एक-दोन महिन्यांत पूर्ण होईल. यात टेबल टेनिस, व्हॉलिबॉल, बास्केटबॉल असे खेळ खेळता येणार आहेत. एवढेच नव्हे, तर भविष्यात विद्यापीठाचे मोठे समारंभ अथवा कार्यक्रमही याच स्टेडिअममध्ये घेण्याचा विद्यापीठाचा प्रस्ताव आहे. तसेच, उच्च दर्जाचे शूटिंग रेंजचे काम पूर्ण होत आहे, असे सांगण्यात आले.
क्रिकेटचे मैदान, जलतरण तलाव व हॉकी
दुसऱ्या टप्प्यात सुसज्ज क्रिकेटचे मैदान, हॉकीसाठी मैदान आणि जलतरण तलावाचे काम हाती घेण्यात येणार आहे. हे तीनही खेळ क्रीडा संकुलात येतात. ऍथलेटिक, व्हॉलीबॉल, शुटिंग रेंज आणि इनडोअर स्टेडिअमचे काम पूर्ण झाले आहे. मात्र, सर्वांत महत्त्वाचे म्हणजे पॅव्हेलियनचे काम अजूनही संथगतीने सुरू आहे. याचे काम सर्वांत आधी होणे अपेक्षित होते.
पुणे विद्यापीठाच्या क्रीडा संकुलाच्या पॅव्हेलियनचा भाग मार्चअखेरपर्यंत पूर्ण होईल. तेथे क्रीडा रसिकांना योग्य आसन व्यवस्थेची सोय केली जाणार आहे. या कामास दिरंगाई होणार नाही, असे सांगत येत्या तीन महिन्यांत त्याचे काम पूर्ण होईल.
– आर. व्ही. पाटील, कार्यकारी अभियंता, पुणे विद्यापीठ