kutimb

जयंत प्रीमियर कबड्डी लीग : एस.एल ,स्फूर्ती रॉयल्स, नरसिंह,आदिती संघांची आघाडी

इस्लामपूर : एस.एल.हरिकन्स,स्फूर्ती रॉयल्स,नरसिंह,आदिती या संघांनी जयंत प्रीमियर कबड्डी लीगमध्ये दुसऱ्या दिवसाअखेर आघाडी घेतली आहे. देशात गाजलेल्या प्रो कबड्डी, व महा कबड्डीच्या धर्तीवर आयोजित या लीगची रंगत दिवसेंदिवस वाढत असून कबड्डी प्रेमींचाही उदंड प्रतिसाद मिळत आहे. दररोज सायंकाळी ५ पासून रात्री उशिरापर्यंत ७ – ८ सामने खेळविले जात आहेत.

नगरसेवक खंडेराव जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली राज्याचे जल संपदा मंत्री ना.जयंतराव पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त जयंत स्पोर्ट्स च्या वतीने या लीगचे आयोजन करण्यात आले आहे. सांगली जिल्हा कबड्डी असो.च्या मान्यतेने ही लीग आयोजित केली आहे.

दुसऱ्या दिवशी राजारामबापू ईगल्स विरुध्द राजेंद्रभाऊ फायटर्स, तसेच यशोधन चलेंजर्स विरुध्द जगदीशआप्पा रायडर्स यांच्यामधील सामने अतिशय रोमहर्षक झाले. फायटर्स,व रायडर्सने केवळ १ गुणाने प्रतिस्पर्धी संघावर मात केली. स्फूर्ती रॉयल्सने एस.एल. हरिकन्सवर ४ गुणांनी,नरसिंह टायगर्सने जगदीश आप्पा रायडर्सवर ६ गुणांनी,तर एस.एल.हरिकन्सने राजेंद्रभाऊ फायटर्सवर ७ गुणांनी निसटता विजय मिळविला आहे.

दुसऱ्या दिवसाच्या पहिल्या सामन्यात आदिती पँथर्सने यशोधन चॅलेंजर्सवर,तर शेवटच्या सामन्यात राजारामबापू ईगल्सने आदित्य पँथर्सवर एकतर्फी यश मिळवले आहे. पहिल्या दिवसाचा उत्कृष्ठ चढाईपटू पदाचा मानकरी एस.एल.हरिकन्सचा दर्शन कानडे,तर उत्कृष्ठ बचावपटू पदाचा मानकरी राजारामबापू ईगल्सचा रोहित वगरे ठरला आहे. त्यांना आयडीबीआय बँक,तसेच अँड.प्रीतम सांभारे यांच्या वतीने सन्मानीत करण्यात आले.

प्रा.शामराव पाटील,तहसिलदार रविंद्र सबनीस,माजी जि.प.अध्यक्ष देवराज पाटील,सातारा डिस्ट्रिक्ट उमेन्स एज्युकेशन सोसायटीच्या अध्यक्षा सौ.रुपाली जाधव,आदिती उद्योग समूहाचे भगत पाटील,सौ.तृप्ती पाटील,पं.स.सदस्य शंकर चव्हाण, माजी नगरसेवक श्रीकांत माने, वाळव्याचे हर्षवर्धन पाटील,तांबवेचे कुणाल पाटील यांच्यासह हजारो कबड्डी प्रेमींनी रात्री उशिरापर्यंत कबड्डी खेळाचा आनंद लुटला.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.