पिंपरी – पिंपरी-चिंचवड महापालिका क्रीडा विभागाला हक्काची जागा मिळत नसल्याचे चित्र आहे. आता पिंपरी चौकातील क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले स्मारकातील हे कार्यालय हलविण्यात येणार असून कार्यालयाचे हे पाचवे स्थलांतर ठरणार आहे.
काही महिन्यांपूर्वीच मासुळकर कॉलनीमधील डॉ. डी. वाय. पाटील तंत्रनिकेतन शाळेमधून क्रीडा विभागाचे कार्यालय पिंपरी चौकातील क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले स्मारकाच्या इमारतीमध्ये स्थलांतर करण्यात आले होते. “अ’ क्षेत्रीय कार्यालयाच्या स्थापत्य विभागाने नुकतीच क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले स्मारकाला भेट देऊन तेथील जागेची पाहणी केली. यापूर्वी हे कार्यालय नेहरुगर येथील कै. अण्णासाहेब मगर स्टेडियमच्या आवारात कार्यरत होते.
स्टेडियमची इमारत धोकादायक अवस्थेत आल्याने तेथून या कार्यालयाचे स्थलांतर करण्यात आले होते. तेथे कार्यालय हलविल्यावर सुमारे वर्षभरात तेथील जागा एका सामाजिक संस्थेला देण्याचे निश्चित झाल्याने तेथून हे कार्यालय पुन्हा सावित्रीबाई फुले स्मारकात हलविण्यात येणार आहे. तेथे हक्काची जागा मिळेल, अशी अपेक्षा या विभागाकडून व्यक्त होत आहे.