राष्ट्रीय स्वयंसेवक संघ करणार वाहतूक समस्येचा अभ्यास

दि. 15 ते 25 ऑगस्टदरम्यान आयोजन : महानगरपालिका, वाहतूक शाखेला देणार अहवाल

पुणे – शहरातील वाहतूक कोंडीचा प्रश्‍न दिवसेंदिवस गंभीर होत आहे. या प्रश्‍नावर तोडगा काढण्यासाठी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाकडून “सामाजित रक्षाबंधन’ या उपक्रमांतर्गत “रस्ते वाहतूक सुरक्षा अभियानाचे’ आयोजन करण्यात आले आहे, अशी माहिती राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या वतीने पत्रकार परिषदेत देण्यात आली.

दि. 15 ते 25 ऑगस्ट या कालावधीमध्ये हे अभियान राबविण्यात येणार आहे. अभियानांतर्गत विविध शैक्षणिक संस्थांकडून शाळा आणि महाविद्यालयांमध्ये विविध स्पर्धांचे आयोजन करण्यात येणार आहे. यामध्ये चित्रकला, निबंध, चित्र प्रदर्शनी आदी स्पर्धा घेण्यात येणार आहेत. यामध्ये संघासह 70 हून अधिक संस्था, संघटना आणि बॅंका सहभागी होणार आहेत
अभियानांतर्गत शहरातील वाहतूक कोंडीच्या कारणांचा आणि ठिकाणांचा अभ्यास करुन त्याचा अहवाल पुणे महानगरपालिका आणि वाहतूक शाखेला सादर करण्यात येणार आहे. यामध्ये स्वयंसेवक, विविध संस्थांसह तज्ज्ञ व्यक्तींचा समावेश आहे, असे पुणे महानगर संघचालक रवींद्र वंजारवाडकर म्हणाले. यावेळी त्यांनी अधिकाधिक पुणेकरांनी सहभागी होण्याचे आवाहन केले.

या अभियानात “रिझन ट्रॅफिक फाऊंडेशन’, “सेव्ह पुणे’ या वाहतूक क्षेत्रात काम करणाऱ्या तज्ज्ञ संस्थांसह डेक्कन एज्युकेशन सोसायटी, महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटी, शिक्षण प्रसारक मंडळी, इंडियन एज्युकेशन सोसायटी महर्षी कर्वे स्त्री शिक्षण संस्था आदी शैक्षणिक संस्थांसह विश्‍व हिंदू परिषद, स्व-रूपवर्धिनी, भारतीय मजदूर संघ, स्वानंद जनकल्याण प्रतिष्ठान, सुराज्य सर्वांगिण विकास प्रकल्पांबरोबर विविध संस्था आणि संघटना सहभागी होणार आहेत, अशी माहिती पुणे महानगराचे कार्यवाह महेश करपे यांनी दिली.

दिव्यांग आणि विद्यार्थ्यांचा विशेष सहभाग
रस्ते वाहतूक सुरक्षा अभियानामध्ये 200 हून अधिक दिव्यांग सहभागी होणार आहेत. या दरम्यान विद्यार्थी रस्ते वाहतूक सुरक्षेसंबंधी शपथ घेणार असून पथनाट्यांचे सादरीकरण करण्यात येणार आहे. यासह विविध बॅंकांमधील कर्मचाऱ्यांनी बॅंकेत येणाऱ्या ग्राहकांच्या जनजागृतीसोबतच दहा दिवसांदरम्यान आपल्या शाखेच्या परिसरातील वाहतूक कोंडीची समस्या स्थानिकांच्या सहकार्याने तोडगा काढण्याचा प्रयत्न करणार आहेत.

समाजापुढील प्रश्‍न समाजानेच पुढे येऊन सोडवावे लागणार आहेत. समाजामध्ये असणारी प्रचंड शक्ती समाजासाठी उपयोगात यावी, यासाठी संघाकडून प्रयत्न करण्यात येतात. हे अभियान देखील या प्रयत्नांचा भाग आहे.
– महेश करपे, कार्यवाह, पुणे महानगर.

Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here