आध्यात्म: कार्तिकी एकादशी महात्म्य

विलास पंढरी

लाखो भक्‍तांचे श्रद्धास्थान असलेल्या पंढरपूरच्या विठ्ठलाच्या शासकीय महापूजेचा मान भाजपाच्या मंत्र्यांना मिळाला आहे. कार्तिकी एकादशीनिमित्त होणारी शासकीय महापूजा महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते होणार असल्याची माहिती श्री विठ्ठल रुक्‍मिणी मंदिर समितीचे कार्यकारी अधिकारी विठ्ठल जोशी यांनी दिली आहे. त्याला महाराष्ट्र सरकारच्या विधी व न्याय विभागाच्या पत्राचा संदर्भ त्यांनी दिला आहे.

हिंदू धर्मकल्पनांनुसार आषाढ शुद्ध एकादशी ते कार्तिक शुद्ध एकादशी या चार महिन्यांच्या काळास “चातुर्मास’ म्हणतात. चातुर्मास म्हणजे चार महिने. भारतीय उपखंडात हा काळ मान्सूनचा असतो. आषाढ शुद्ध एकादशीला सूर्य मिथुन राशीत येतो तेव्हा चातुर्मासाची सुरुवात होते. आषाढ शुद्ध एकादशीला पद्मा एकादशी किंवा देवशयनी एकादशी असे म्हणतात. कार्तिक शुद्ध एकादशीस चातुर्मास संपतो तेव्हा सूर्य तूळ राशीत आल्यावर कार्तिक शुद्ध एकादशी येते. कार्तिक शुद्ध एकादशीस “प्रबोधिनी एकादशी असे नाव आहे. कार्तिक शुद्ध द्वादशीला चातुर्मास संपतो. चतुर्मासातल्या देवशयनी एकादशीला देव झोपतात आणि प्रबोधिनीला उठतात, अशी धारणा आहे. शेतीतील पेरण्या ज्येष्ठात होतात. आषाढ येतो तेव्हा देव शयनात जातात अशी धारणा आहे. आश्‍विन महिन्यात पिकांची तोडणी होते, कार्तिकात मळणी होऊन देवोत्थानची वेळ येते अशी हिंदू परंपरा आहे.पृथ्वीवरील रज-तम वाढल्याने या कालावधीत सात्त्विकता वाढवण्यासाठी चातुर्मासात व्रतस्थ राहावे, असे शास्त्र आहे.

“आषाढी कार्तिकी साधू जन येती हो, भक्‍तजन येती, चंद्रभागेमाजी स्नाने जे करती’ ही प्रसिद्ध आरती आहे. आषाढ महिन्यात राज्यभरातून संताच्या पालख्या पंढरपुरात दाखल होतात त्या आषाढी एकादशीला. या वारीचा थाटच वेगळा असतो. पण तरीही कार्तिकी एकादशीचे महत्त्व तसूभरही कमी होत नाही. अर्थात आषाढी आणि कार्तिकी या दोन्ही एकादशी पावसाळ्यात येतात.

कार्तिक शुद्ध एकादशी ही मोठी एकादशी म्हणूनही ओळखली जाते. या दिवशी वारकरी संप्रदायातील तसेच वैष्णव पंथीय एक दिवसाचा उपवास करतात. चातुर्मास व्रताचा हा शेवटचा दिवस मानला जातो. शिवाय या एकादशीलाच प्रबोधिनी एकादशी असेही म्हणतात. या दिवशी भगवान विष्णू त्यांच्या चातुर्मासातल्या चार महिन्यांच्या योग निद्रेतून जागे होतात व पुन्हा ह्या सृष्टीच्या पालनाचा कार्यभार स्वीकारतात असे मानतात, त्यामुळे हिला देवोत्थनी किंवा देव उठी एकादशी असेही म्हणतात.

तुलसी विवाहाची सुरुवात या एकादशीपासून होते. कार्तिक पौर्णिमेला तुलसी विवाहाची सांगता होते आणि हिंदू समाजातील लग्नसराईचे दिवस सुरू होतात. अख्ख्या महाराष्ट्राचे लाडके दैवत असलेल्या पंढरीच्या विठुरायाचे स्मरण करण्याचा, त्याच्या नावाने उपवास करण्याचा हा दिवस असतो. संपूर्ण वर्षामध्ये एकूण चोवीस एकादशी येतात. प्रत्येक महिन्यातील शुक्‍ल व कृष्ण पक्षात एक व अधिक मास असल्यास त्या दोन एकादशी जास्त येतात. कार्तिकी एकादशीबद्दल एक कथा प्रचलित आहे.

मृदूमान्य या राक्षसाने भगवान शंकराची भक्‍तिपूर्वक आराधना केली. त्याचा भक्‍तिभाव पाहून भगवान शंकर प्रसन्न झाले. त्यांनी मृदुमान्य राक्षसाला वर दिला की, तू कोणत्याही पुरुषाकडून मरणार नाहीस. पण एका स्त्रीच्या हातून मारला जाशील. असा वर मिळताच या राक्षसाचा पूर्वी असलेला मृदू स्वभाव नष्ट झाला. त्याचे कारण म्हणजे शंकरानेच त्याला अमरत्वाचा वर दिलेला असल्याने त्याच्यापुढे कुणाचाही निभाव लागला नाही. सर्व देव व स्वतः भगवान शंकर एका गुहेत लपले. त्यांच्या श्‍वासातून एक देवता निर्माण झाली. तिचेच नाव एकादशी. तिने मृदुमान्याला ठार मारले. तेव्हा प्रचंड पाऊस कोसळला. त्यामुळे देवांची आंघोळ झाली व भुयारात लपून बसल्यामुळे काहीही खायला न मिळाल्याने उपवासही घडला. त्या दिवशीच्या घटनेपासून एकादशीचे व्रत म्हणून उपवास करण्याची प्रथा सुरू झाली.

या दिवशी लवकर उठून नदी किंवा समुद्रावर जाऊन स्नान करावे. आपल्या कुलदैवतांची, विठ्ठलाची व विष्णूची पूजा करून तुळशीपत्रे वाहावीत असे म्हटले जाते. ज्यांना पंढरपूरला जाणे शक्‍य होत नाही असे बहुसंख्य भक्‍त जवळच्या विठ्ठल मंदिरात अवश्‍य जातात व उपवासही करतात. पद्मपुराणामध्ये एकादशी व्रताचे पुढीलप्रमाणे महत्त्व सांगितले आहे.

अश्वमेधसहस्त्राणि राजसूयशतानि च । एकादश्‍युपवासस्य कलां नार्हन्ति षोडशीम्‌ ।।
अर्थ : अनेक सहस्र अश्‍वमेध यज्ञ आणि शेकडो राजसूय यज्ञ यांना एकादशीच्या उपवासाच्या सोळाव्या कलेइतकेही, म्हणजे सव्वासहा टक्‍केही महत्त्व नाही.

पंधरा दिवसांतून एक दिवस संपूर्ण उपवास केल्यास पचनेंद्रियांना आराम मिळतो. अशा प्रकारे एकादशीला आरोग्यदृष्ट्याही महत्त्व आहे. 14 दिवसांतील आहाराचा जो रस बनतो, त्याचे उपवासाने ओजात रूपांतर होत असल्याने एकादशीच्या उपवासाला महत्त्व आहे. गृहस्थाश्रमींनी केवळ शुक्‍ल पक्षातील एकादशीचा उपवास करावा, चातुर्मासात मात्र दोन्ही पक्षांतील एकादशीचे व्रत करावे, असे शास्त्र सांगते.

Leave A Reply

Your email address will not be published.