महिला तहसीलदाराला जिवंत जाळणाऱ्याचा मृत्यू

हैदराबाद:  महिला तहसीलदाराला तिच्या कार्यालयातच जिवंत जाळणाऱ्याचा गुरूवारी मृत्यू झाला. ते धक्कादायक कृत्य करताना संबंधित आरोपीलाही आगीने घेरले. गंभीर भाजल्यामुळे त्याला रूग्णालयात दाखल करण्यात आले होते. तिथेच त्याचे निधन झाले.

जमीन वादामुळे त्रस्त असलेल्या के.सुरेश याने 4 नोव्हेंबरला टोकाचे पाऊल उचलले. त्याने तहसीलदार विजया रेड्डी यांच्या दालनात जाऊन त्यांच्या अंगावर पेट्रोल टाकले. लाईटरच्या सहाय्याने त्याने रेड्डी यांना पेटवून दिले. त्या घटनेत रेड्डी यांचा जागीच मृत्यू झाला. रेड्डी यांना वाचवण्यासाठी त्यांच्या वाहनाचा चालक आणि इतर काही जण धावले. मात्र, त्यात त्यांना यश आले नाही. त्या घटनेत गंभीर भाजलेल्या चालकाचे दुसऱ्या दिवशी निधन झाले.

त्या धक्कादायक घटनेमुळे संपूर्ण तेलंगण राज्यात मोठी खळबळ उडाली. सुरेश याने केलेल्या कृत्याचा सर्व स्तरांतून निषेध करण्यात आला. त्याशिवाय, निषेधासाठी तेलंगणमधील महसूल विभागाच्या कर्मचाऱ्यांनी निदर्शने केली. दरम्यान, सुरेश याने भयानक कृत्य करण्यामागे इतरही कुठले कारण आहे का याचा तपास पोलीस करत आहेत.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.