अबाऊट टर्न: लादेन

 हिमांशू
लादेन सापडला का? लादेनला पकडलं का? असे प्रश्‍न अत्यंत भयग्रस्त मुद्रेनं कुणी एकमेकांना विचारू लागले तर? मूळचा सौदी अरेबियाचा असणारा लादेन जगभरात आतंक माजवल्यानंतर काही वर्षांपूर्वी कायमचा संपला, हे सगळ्यांना ठाऊक आहे. पाकिस्तानच्या आबोटाबादमध्ये अमेरिकेच्या लष्करी पथकाने त्याचा खात्मा केला. त्या कारवाईची दृश्‍यं आपण सर्वांनी पाहिली. या कुख्यात दहशतवाद्याचे थडगं समुद्राच्या तळाशी बांधले. काही दिवसांपूर्वी त्याच्या मुलालासुद्धा ठार मारल्याच्या बातम्या आल्या होत्या. मग आता त्याचे नाव घेताच कोण एवढे घाबरतंय? तेही भारतात? होय, या नावाची भीती आजही कायम आहे.

यावर्षी आतापर्यंत 57 जणांचा बळी लादेनने घेतलाय. त्याच्या दहशतीने अनेकांनी घराबाहेर पडणे सोडून दिलंय. गावागावात एकच चर्चा आहे, लादेनला पकडले का? खरे तर लादेन वाळवंटी प्रदेशातला. तरीही त्याला शोधायला इतकी वर्षे लागली. हाच लादेन जर वीरप्पनसारखा किंवा नक्षलवाद्यांसारखा जंगली भागात मुक्‍कामाला असता, तर कदाचित कधीच सापडला नसता. पण आतातरी तो खरंच मेलाय का? की जिवंतच आहे? तो भारतात कसा आणि कधी घुसला? आसामसारख्या जंगलांनी वेढलेल्या भागात त्याला कसं शोधणार? आसामात गेलेल्या नवख्या माणसाला हे प्रश्‍न नक्की पडतील. कारण लादेनच्या चर्चा तिथं गावागावात आणि घराघरात ऐकायला मिळतील. लादेनने ठार केलेल्या माणसांच्या घरातले लोक आक्रोश करताना दिसतील.

पण हा लादेन दोन नव्हे, तर चार पायांचा आहे. अजस्र शरीराचा. अत्यंत ताकदवान. तो दहशतवादी असला, तरी त्याला ठार मारणं शक्‍य नाही. तशी परवानगीच नाही. मुख्य म्हणजे, लादेन एक नसून अनेक आहेत. वेळी-अवेळी गावात घुसून दिसेल त्याला पायदळी तुडवणाऱ्या जंगली हत्तीला “लादेन’ असं नाव दिलं गेलंय. ते गावकऱ्यांनीच दिलंय. पिसाट हत्तींच्या उपद्रवाबद्दल सरकारने गांभीर्यानं विचार करावा म्हणून! लादेनचा माग काढत वनविभागाचे असंख्य कर्मचारी अहोरात्र जंगलात फिरताहेत.

लादेनला शोधण्यासाठी ड्रोनचा वापर करतायत. तो दिसला की लगेच इंजेक्‍शन देऊन बेशुद्ध करून पकडले जाणार आहे. परंतु जोपर्यंत हा हत्ती सापडत नाही, तोपर्यंत लोकांना जीव मुठीत घेऊन जगावं लागतंय. आपल्या देशात सगळ्यात जास्त म्हणजे सहा हजारांहून अधिक हत्ती कर्नाटकात आहेत. अधूनमधून तळकोकणात ते अशीच दहशत माजवतात. हत्तींच्या संख्येच्या बाबतीत आसामचा क्रमांक दुसरा आहे. कर्नाटकातही हत्तींच्या हल्ल्यात माणसं नेहमी दगावत असली, तरी आसामात त्यांची दहशत अधिक आहे. उभ्या शेतांची नासधूस करणारे हे हत्ती खवळल्यावर कुणालाही पायाखाली घेतात.

लादेन या नावाचीही एक जन्मकथा आहे. 2006 मध्ये आसामातल्या सोनितपूर जिल्ह्यात एक जंगली हत्ती खवळला होता. त्यानं सुमारे डझनभर माणसं पायाखाली चिरडून मारली. नेमक्‍या त्याच वेळी ओसामा बिन लादेनसुद्धा चर्चेत होता. त्यामुळे आसामात दहशत माजवणाऱ्या या हत्तीला “लादेन’ असं नाव दिलं गेलं. या हत्तीला यावर्षीच ठार करण्यात आलं.परंतु तेव्हापासून लोकांचा संहार करणाऱ्या प्रत्येक हत्तीला “लादेन’ याच नावानं ओळखलं जाऊ लागलं. याला म्हणतात दहशत!

Leave A Reply

Your email address will not be published.