शर्मिला जगताप
आपले जीवन धकाधकीचे, कष्टाचे, त्रासाचे झाले आहे. असे असले तरी दैनंदिन जीवनात अशा अनेक गमतीजमती घडतात त्यातून विनोद निर्माण होतो. त्यामुळे आपले जीवन हे अधिक रसिक, अधिक विनोदी आणि खेळकरही बनत चालले आहे. काही प्रसंगांमुळे घडलेल्या विनोदामुळेच आपले जीवन खऱ्या अर्थाने खुलत आहे.
एक ओळखीतील महिला बोलताना नेहमी काहीतरी घोटाळा करते. “या वर्षीही 15 ऑगस्ट हा 15 ऑगस्टलाच आला’ हे वाक्य ती दरवर्षी न चुकता म्हणते. पण यातील गडबड तिच्या लक्षात येत नाही. आम्हीही तिच्या बोलण्यातील विनोदाचा आनंद घेतो. एक आणखी एक महाशय आहेत. ऑफिसमध्ये ते नेहमीच उशिरा यायचे. उशिरा येणे त्यांचे नित्याचे होते. शिवाय उशिरा येण्याचे कारणही एकच सांगत- “लेट झालो म्हणून उशीर झाला.’
आणखी एक महाशय आहेत ज्यांचे लग्न झालेले नाही. पन्नाशी उलटली तरी लग्न काही झाले नाही. साहजिकच त्यांना “लग्न का केले नाही’ असा प्रश्न सहज कुणीतरी नेहमीच विचारत असत. त्यावर ते नेहमीचेच उत्तर देत असत- “कामाच्या गडबडीत लग्नासाठी वेळच मिळाला नाही.’ आता तुम्हीच सांगा, आहे की नाही गंमत!
एका कार्यालयात एक वैतागलेला अशिक्षित इसम तक्रार करण्यासाठी गेला. त्याने तक्रार अर्ज मागितला. तेव्हा तेथील कर्मचाऱ्याने त्या इसमास “कोणत्या साहेबांच्या नावे तक्रार करायची आहे’, असे विचारले. त्यावर “झोन साहेब’ असे त्या इसमाने चटकन उत्तर दिले. नावाबद्दल शंका आली पण तरीही त्या कर्मचाऱ्याने तक्रार अर्ज लिहिण्यास सुरुवात केली.
“मा. झोन साहेब यासी, स. न. वि. वि.’ असा मजकूर लिहून झाला. कर्मचाऱ्याला नावाबद्दल पुन्हा शंका आली म्हणून त्या इसमास झोन साहेबांचे ऑफिस कोणते आहे, याबद्दल विचारणा केल्यावर त्या इसमाने शांतपणे “वीज बिल’, असे उत्तर दिले.
या उत्तराने तो कर्मचारी सर्द झाला. तक्रार अर्ज लिहिण्याचे थांबवून वीज मंडळाच्या दुसऱ्या कार्यालयात फोन करून झोन साहेबांबद्दल चौकशी केली. झोन नावाचे साहेब नाहीत असे उत्तर आले. कर्मचाऱ्याने इतर कर्मचाऱ्यांशी याबाबत चौकशी करता आपल्याच वीज मंडळाचे जे विभाग पाडले आहेत त्यांना “झोन्स’ म्हणतात, असा सोपा निष्कर्ष पुढे आला. त्या इसमाने मात्र विभाग प्रमुखांचे “झोनसाहेब’ असे आडनाव देऊन बारसेच करून टाकले! हा असा घोटाळा होऊन विनोद निर्माण झाला.
एका महाशयांनी आपल्या कार्यकर्त्यांना मोबाइल फोनवर एक मेसेज पाठविला- “23 तारखेला डिसेंबर महिन्याचा अजिंठा आहे.’ कार्यकर्ते गोंधळात पडले. मेसेजमध्ये माननीयांनी “अजिंठा’ लिहिले होते. अजिंठा म्हणजे काय? तिकडे कुठे सहल आहे का? शेवटी एकाला शोध लागला, अजिंठा नव्हे “अजेंडा’ असावा.