Relief for Airline: आर्थिक तंगीत असलेल्या स्पाइसजेटला मोठा दिलासा मिळाला आहे. मुंबईचे उद्योगपती हरिहर महापात्रा आणि प्रीती महापात्रा यांनी या विमान कंपनीत सुमारे 1100 कोटी रुपयांची गुंतवणूक करण्याचा निर्णय घेतला आहे. त्या बदल्यात त्यांना सुमारे 19 टक्के हिस्सेदारी मिळेल. यामुळे एअरलाइन्सचे प्रवर्तक अजय सिंग यांची हिस्सेदारी 56.49 टक्क्यांवरून 38.55 टक्क्यांवर येईल. मंगळवारीच स्पाइस जेटने गो फर्स्ट एअरलाइन खरेदी करण्यात रस दाखवला होता. आता या डीललाही गती मिळू शकते.
गो फर्स्ट खरेदी करण्याची प्रक्रिया होईल जलद –
इकॉनॉमिक टाइम्सच्या रिपोर्टनुसार, या डीलमध्ये अराईज अपॉर्च्युनिटीज फंडला 3 टक्के आणि इलारा कॅपिटलला 8 टक्के हिस्सेदारी मिळेल. गेल्याच आठवड्यात स्पाइस जेटने अनेक लोकांकडून ऑफर आल्याचे जाहीर केले होते. स्पाइस जेटनेही बंद पडलेली विमान कंपनी गो फर्स्ट खरेदी करण्याचा प्रस्ताव तयार करण्यास सुरुवात केली आहे. आता गुंतवणूक मिळाल्यानंतर स्पाइस जेट ही कर्जबाजारीपणात अडकलेली विमान कंपनी खरेदी करण्याच्या प्रक्रियेला गती देऊ शकते.
स्पाइस जेट आर्थिक तंगीशी झुंजत होती –
रोखीच्या तुटवड्याशी झुंजत असलेल्या स्पाइस जेटने गो फर्स्ट खरेदी करण्यात रस दाखवला तेव्हा सर्वांनाच आश्चर्याचा धक्का बसला. कंपनीने शेअर बाजारालाही याबाबत माहिती दिली होती. कंपनीने गो फर्स्टच्या रिझोल्यूशन प्रोफेशनलशीही संपर्क साधला होता. गो फर्स्ट मे महिन्यापासून बंद आहे. एअरलाइन्सकडे 54 Airbus A320 Neo विमाने आहेत. कंपनीने प्रॅट अँड व्हिटनीच्या सदोष इंजिनांना आपल्या त्रासाला जबाबदार धरले. यापूर्वी जिंदाल पॉवरनेही गो फर्स्ट खरेदी करण्याचा प्रस्ताव दिला होता. स्पाइस जेट व्यतिरिक्त शारजाहचे स्काय वन आणि सॅफ्रिक इन्व्हेस्टमेंट देखील गो फर्स्ट खरेदी करण्यात रस दाखवत आहेत.
कोण आहेत हरिहर आणि प्रीती महापात्रा –
हरिहर आणि त्यांची पत्नी प्रीती हे मुंबईस्थित महापात्रा युनिव्हर्सल लिमिटेड कंपनीचे प्रवर्तक आहेत. ही कंपनी रिअल इस्टेट, पायाभूत सुविधा, सल्लागार, ग्राहक आणि रिटेल क्षेत्रात काम करते. गुजरातमधील खजोद येथे देशातील सर्वात उंच इमारत बांधण्याची घोषणा केल्यावर हरिहर चर्चेत आले होते. मात्र, ही योजना कधीच प्रत्यक्षात आली नाही. प्रीती महापात्रा युरोप, आशिया आणि मध्य पूर्वेतील बाजारपेठांमध्ये अनेक ब्रँड लॉन्च करण्यासाठी ओळखल्या जातात. त्या एक एनजीओही चालवतात. त्यांनी भाजपच्या तिकिटावर उत्तर प्रदेशमधून राज्यसभेची निवडणूकही लढवली होती.