Raj Thackeray In Delhi| महायुतीच्या लोकसभा जागा वाटपाबाबत अद्याप कोणताही अंतिम निर्णय घेण्यात आलेला नाही. यातच आता महाराष्ट्र नवनिर्माण सेना महायुतीत सहभागी होण्याच्या दृष्टीने मोठी पावलं उचलत असल्याचे दिसत आहे. सोमवारी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या भेटीसाठी राज ठाकरे दिल्लीत दाखल झाले आहेत. यावेळी मनसेकडून दक्षिण मुंबई, नाशिक किंवा शिर्डी या तीन पैकी किमान दोन लोकसभा मतदारसंघांची मागणी करण्यात आल्याची माहिती समोर येत आहे.
महायुतीच्या कोट्यातून मनसेला एक किंवा दोन जागा सोडल्या जाण्याची शक्यता आहे. भाजपकडून राज ठाकरे यांच्या पक्षासाठी दक्षिण मुंबईचा मतदारसंघ सोडला जाईल, अशी चर्चा गेल्या काही दिवसांपासून सुरु आहे. या पार्श्वभूमीवर राज ठाकरे यांच्या दिल्लीवारीला महत्त्व प्राप्त झाले आहे. मात्र दिल्लीत दाखल झाल्यावर राज ठाकरे आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्यात नेमकी काय चर्चा होणार हे पाहावे लागणार आहे.
दरम्यान, राज ठाकरेंना महायुतीत घेण्याची मागील काही दिवसांपासून हालचाली सुरु होत्या. त्या काळात मनसेच्या नेत्यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या भेटी देखील घेतल्या. आता थेट राज ठाकरेंना दिल्लीत बोलवण्यात आले असून, जागावाटपावर चर्चा होणार असल्याची माहिती मिळत आहे. Raj Thackeray In Delhi|
मनसेकडून तीन लोकसभा मतदारसंघांची मागणी होण्याची शक्यता
मनसेकडून दक्षिण मुंबई, नाशिक किंवा शिर्डी या तीन पैकी किमान दोन लोकसभा मतदारसंघांची मागणी केली जाणार असल्याची माहिती आहे. विशेष म्हणजे या तीनही जागा एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेकडे आहेत. त्यापैकी एक जागा मनसेचे नेते बाळा नांदगावकरांना देण्याची भाजपने तयारी दर्शवली असल्याची माहिती मिळत आहे. दरम्यान, दिल्लीत दाखल झाल्यावर माध्यमांना “मला काहीही माहीत नाही. मला फक्त या असं सांगितल्याने मी आलो आहे.” असं राज ठाकरेंनी सांगितले. Raj Thackeray In Delhi|
यापूर्वी अनेकदा राज ठाकरे यांनी भाजप नेत्यांची भेट घेतली आहे. मात्र भाजप-मनसे युतीबाबत काहीही ठोस घडले नाही. परंतु आता अचानक राज ठाकरे दिल्लीत दाखल झाल्याने मनसेची महायुतीत एन्ट्री होण्याच्या चर्चांनी जोर धरला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी 400 पारचा नारा दिला आहे. हा नारा पूर्ण करण्यासाठी भाजपकडून पूर्णपणे प्रयत्न केले जात असल्याचे दिसत आहे.
हेही वाचा :
जागावाटपाच्या घोषणेपूर्वीच काँग्रेसचा मोठा निर्णय ; ‘या’ उमेदवाराच्या नावावर शिक्कामोर्तब