सातारा – श्री शिवाजी महाराज यांचा शिवजन्मोत्सव आणि खासदार उदयनराजे भोसले यांच्या जन्मदिनाचे औचित्य साधून उदयनराजे मित्र मंडळाच्यावतीने “राजधानी सातारा’ या शीर्षकाखाली झी मराठी वहिनीचा “चला हवा येऊ द्या’ हा मनोरंजनाचा कार्यक्रम बुधवारी दि.23 रोजी जिल्हा परिषदेच्या मैदानावर आयोजित करण्यात आला आहे.
या कार्यक्रमाकरिता उभारण्यात येणाऱ्या व्यासपीठ आणि इतर सुविधां उपलब्ध करुन देण्याच्या कामाचा शुभारंभ आज उदयनराजे मित्र समुहाच्यावतीने श्रीफळ वाढवून करण्यात आला. त्याप्रसंगी समूहाच्यावतीने याबाबतची माहिती देण्यात ाली. त्यानुसार 80 बाय 60 चे भव्य व्यासपीठ याठिकाणी उभारण्यात आले आहे. तसेच अत्याधुनिक पध्दतीचे आकर्षक स्टेज बॅकग्राऊंड, उच्च तंत्रज्ञानाने युक्त ध्वनीयंत्रणा आणि उच्च क्षमतेची जनरेटरवरील विविध प्रकारची वीजा व्यवस्था पुरवण्यात येणार आहे.
कलाकारांसाठी एकूण 20 मेकअप रुम्स तसेच प्रेक्षक आणि कलाकारांसाठी आपत्कालीन कारणाकरीता तात्पुरच्या स्वच्छतागृहाची व्यवस्था केली जाणार आहे. जिल्हा परिषदेच्या मैदानावर प्रेक्षकांसाठी खुर्च्यांची आसन व्यवस्था करण्यात येणार आहे. स्टेजवरील कार्यक्रम अधिक चांगला दिसावा म्हणून ठिकठिकाणी एलईडी स्क्रिनस् उभारण्यात येणार आहेत.
कार्यक्रमाच्या लाईव्ह प्रक्षेपणासाठी व्हॅनिटी व्हॅन्स उपलब्ध असणार आहेत. खुल्या मैदानात होणारा हा कार्यक्रम सर्वांसाठी खुला आहे. कुठलेही पास किंवा व्हीआयपी प्रवेशिका दिल्या जाणार नाहीत. सर्वच नागरिक व्हीआयपी असल्याने कोणत्याही प्रकारचे पासेस किंवा प्रवेशिका ठेवण्यात येऊ नयेत, अशा सूचना उदयनराजे भोसले यांनी दिल्या आहेत. पत्रकार, छायाचित्रकार आणि विविध वृत्तवाहिन्यांच्या प्रतिनिधींची त्यांच्या कामासाठी व्यवस्था करण्यात आली आहे. मैदानावर सुरक्षा रक्षक आणि आपत्कालीन परिस्थितीकरीता अग्नीशमन दल आणि रुग्णवाहिका तैनात करम्यात येणार आहे. करोनाच्या नियमांचे पालन करुन या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. आगामी “झुंड’ या हिंदी चित्रपटाची टीम, अजय-अतुल, नागराज मंजुळे आणि
चित्रपटातील कलाकार या कार्यक्रमाला उपस्थित राहणार आहेत. या स्टेज आणि विविध सुविधा उभारण्याप्रसंगी माजी उपनगराध्यक्ष मनोज शेंडे, जिल्हा परिषदेचे माजी सभापती सुनील काटकर, काका धुमाळ, पंकज चव्हाण, माजी उपनगराध्यक्ष किशोरतात्या शिंदे, बाळासाहेब गोसावी, जिल्हा परिषदेचे माजी सदस्य सुनील सावंत, अभिनेते व जिल्हा परिषद माजी सदस्य समृध्दी जाधव, फिरोज शेख, रोहित सावंत, ऍड. विनित पाटील, प्रशांत निंबाळकर, सुनील बर्गे, राहुल पाटोळे, शेतकरी संघटनेचे राजू पाटील, संदीप शिंदे,यांच्यासह बहुसंख्य कार्यकर्ते, मित्रसमुहाचे हितचिंतक मोठया संख्येने उपस्थित होते.