विशेष : अक्षय्य तृतीया

शर्मिला जगताप

वैशाख शुद्ध तृतीयेला अक्षय्य तृतीया म्हणतात. अक्षय्य म्हणजे कधीही क्षय न पावणारी. अक्षय्य तृतीया शुक्‍ल पक्षात येते. हा मुहूर्त साडेतीन मुहुर्तांपैकी एक मानला जातो. या तिथीस अक्षय्य तृतीया हे नाव पडण्यामागचे कारण “मदनरत्न’ या ग्रंथात दिले आहे-

अस्यां तिथौ क्षयमुर्पति हुतं न दत्तं
तेनाक्षयेति कथिता मुनिभिस्तृतीया ।
उद्दिश्‍य दैवतपितृन्क्रियते मनुष्यै
स्तच्चाक्षयं भवति भारत सर्वमेव ।।

अर्थ- श्रीकृष्ण अर्जुनास सांगतात की, या तिथीस केलेले दान, हवन तसेच देव आणि पितर यांप्रती केलेली कार्ये कधीही व्यर्थ होत नाहीत, अविनाशी राहतात.

वसंत ऋतूतील कडक उन्हाळा व सृष्टीसौंदर्य यामुळे उदंकुंभदानाला धर्मरूपता व या दिवसाला सणाचे महत्त्व प्राप्त झाले आहे. नृत्य-गायनादी विधी वसंतोत्सव करण्याची वहिवाट आहे. कोणतेही मंगलकृत्य अगर व्रत आचरण्यास हा अत्यंत शुभ दिवस मानला जातो. सध्याच्या काळात या शुभमुहुर्तावर सोने, चांदी आणि वस्त्र इ. खरेदी केले जाते. वैशाख महिना हा मराठी महिन्यांतील दुसरा महिना. या महिन्यात महत्त्वाचे सण व उत्सव येतात.

यातील महत्त्वाचा सण म्हणजे अक्षय्य तृतीया. यावेळी सूर्याची प्रखरता तीव्रतेने जाणवते. या महिन्यात सर्व वातावरण तापलेले असते. त्यामुळे या महिन्यात गरिबांना कुंभदान, सार्वजनिक पाणपोई सुरू करणे, गरजूंना पंखा, छत्री यांचे दान करावे, असे म्हटले जाते. वसंतोत्सव साजरा करून स्त्रिया कैरीचे थंड पन्हे देतात. अक्षय्य तृतीया विवाहासाठी शुभ दिवस मानला जातो. महाभारतामध्ये अक्षय्य तृतीयेचा उल्लेख सापडतो. महर्षी व्यास यांनी याच शुभ दिवशी महाभारत लिहिण्यास सुरुवात केली आणि त्यांचे लेखनिक म्हणून गणपतीने काम केले अशी आख्यायिका प्रचलित आहे.

महाराष्ट्रातील स्त्रिया चैत्र महिन्यात चैत्रगौरीची स्थापना व पूजा करतात. चैत्रातील एखाद्या दिवशी हळदीकुंकवाच्या निमित्ताने बायकांना घरी बोलावून मोगऱ्याची फुले किंवा गजरा आणि पन्हे देतात. त्या हळदीकुंकू समारंभांचा म्हणजे गौरी उत्सवाचा अक्षय्य तृतीया हा शेवटचा दिवस असतो.

खानदेशात या सणाला “आखजी’ म्हटले जाते. आठवडाभर आधी लहान मुली गवराई पेरतात. लहानशा टोपलीत शेतातील माती टाकून त्यात सर्वप्रकारचे धान्य पेरले जाते. रोज थोडे थोडे पाणी टाकून ही गवराई वाढविली जाते. गवराई जेवढी भरभरून वाढणार तेवढे अन्नधान्य यावर्षी पिकणार अशी पूर्वापार येथे धारणा आहे.

आठवड्याभरात गवराई चांगली वितभर किंवा त्यापेक्षाही मोठी होते. अक्षय्य तृतीयेच्या दिवशी गावातील सर्व मुली या गवराई कोरड्या विहिरीत टाकण्यासाठी सकाळीच जमतात. यावेळी सोबत शिदोरी आणलेली असते. सणवारासाठी बनविलेले फराळ शक्‍यतो आंब्याच्या झाडाखाली खातात. आंब्याला झोका बांधून दिवसभर झोक्‍यावर गाणी म्हणत या सणाचा आनंद घेतला जातो.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Comments are closed.