“भारत बायोटेक’ला लसनिर्मिती प्रकल्पासाठी पुण्यात जागा!

पुणे -भारत बायोटेक कंपनीला पुण्यातील मांजरी येथे लसनिर्मितीसाठी तत्काळ जागा देण्याचे आदेश न्यायालयाने दिले आहेत. त्याबाबत जिल्हाधिकारी यांनी मांजरी येथील संबंधित जागेची पाहणी करून पुढील कार्यवाही करण्यासंदर्भात अधिकाऱ्यांना आदेश दिले आहेत.

उच्च न्यायालयाच्या आदेशानंतर उपमुख्यमंत्री पवार यांनी पुणे जिल्हाधिकारी यांना तत्काळ जागेची पाहणी करून कार्यवाहीचे आदेश दिले.  त्यानुसार जिल्हाधिकारी डॉ. देशमुख यांनी बुधवारी मांजरी येथे जाऊन जागेची पाहणी केली.

जवळपास 12 हेक्‍टर जागा असून या जागेच्या पुढील कार्यवाहीसाठी अधिकाऱ्यांना आदेश दिले आहेत. हवेली तालुक्‍यातील मांजरी येथे वन विभागाची जमीन आहे. “भारत बायोटेक’ कंपनीने मांजरी येथील संबंधित रिकाम्या जागेवर प्रकल्प उभा करण्यासंदर्भात राज्य सरकारकडे मागणी केली होती.

मात्र, राज्य सरकारने याबाबत सहमती दर्शवली नसल्याने याप्रकरणी उच्च न्यायालयात दाद मागण्यात आली. उच्च न्यायालयाने ही जागा वन विभागाची असून करोना प्रादूर्भाव आणि लसीकरणाबाबतची परिस्थिती पाहता तत्काळ “भारत बायोटेक’ कंपनीला देण्यात यावी, असे आदेश दिले आहेत. त्यामुळेच लवकरच याठिकाणी “भारत बायोटेक’चा प्रकल्प उभा राहणार असून, त्यामुळे कोव्हॅक्‍सिन लसीच्या निर्मितीला गती मिळणार आहे.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Comments are closed.