पुणे – “ती’ चूक शिक्षिकेला भोवली

हेल्पलाइनचा नियम न पाळल्याने निलंबन

पुणे – महापालिकेकडून करोना रुग्णांना बेड मिळावा या उद्देशाने सुरू केलेल्या बेड व्यवस्थापन हेल्पलाइनवर कामात कसूर केल्याचा ठपका ठेवत हेल्पलाइनसाठी नेमणूक केलेल्या शिक्षिका आशा विजय पाटील यांना महापालिका प्रशासनाकडून अखेर निलंबित केले आहे.

 

या हेल्पलाइनवर थेट उच्च न्यायालयात सुनावणी सुरू असताना न्यायालयानेच फोन करण्याच्या सूचना दिल्या होत्या. त्यावेळी डॅशबोर्डवर पाच आयसीयू बेड शिल्लक असतानाही पाटील यांनी बेड नसल्याचे सांगत फोन कट केला होता. त्यावरून न्यायालयाने महापालिकेची कानउघडणी केल्यानंतर ही कारवाई करण्यात आली आहे.

शहरातील करोनास्थितीबाबत बुधवारी मुंबई उच्च न्यायालयात सुनावणी सुरू असताना याचिकाकर्त्यांच्या वकिलांनी महापालिकेच्या हेल्पलाइन क्रमांक सुरू असले तरी त्याबाबत तक्रारी असल्याचे सांगत, त्यावर फोन करून अनुभव घेण्याची विनंती केली. त्यानुसार, न्यायालयातून दुपारी 2 वाजून 29 मिनिटांनी पालिकेच्या हेल्पलाइन क्रमांकावर फोन आला. त्यापूर्वी डॅशबोर्डवर उपलब्ध असलेल्या बेडची माहिती निश्‍चित करून हा फोन करण्यात आला. हा फोन आल्यानंतर करोना रुग्णासाठी आयसीयू बेड हवा आहे, अशी विचारणा केली.

त्यावेळी हेल्पलाइवर असलेल्या शिक्षिकेने “आता बेड नाही नंतर फोन करा’ असे सांगितले. त्यावेळी समोरून “बेड ऑनलाइन दिसत आहेत’ असे सांगण्यात आले. मात्र, “इथं दिसत नाहीत’ असे सांगत फोन ठेवला होता. ही बाब समोर आल्यानंतर त्यांना तातडीने कारणे दाखवा नोटीस बजावली होती. त्यात त्यांनी चुकून हा प्रकार घडल्याचा खुलासा केला आहे.

 

मात्र, त्याच वेळी अशाप्रकारे हेल्पलाइनवर फोन आल्यानंतर बेड उपलब्ध नसला तरी, संबंधित फोन उचलणाऱ्या व्यक्‍तीने नियमावलीनुसार रुग्णाची पूर्ण माहिती, पत्ता, संपर्क क्रमांक तसेच इतर आवश्‍यक फॉरमॅटमध्ये माहिती घेऊनच फोन ठेवणे अपेक्षित आहे. हा नियम पाटील यांनी पाळला नसल्याने त्यांचे निलंबन केल्याचे सामान्य प्रशासन विभागाकडून सांगण्यात आले.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Comments are closed.