पुणे- भारती विद्यापीठ परिसरात एका सराफ व्यावसायिकाला “स्पेशल 26′ चित्रपटातील कथेप्रमाणे लुटण्यात आले. संबंधित सराफाचे अपहरण करून 20 लाख रु. आणि 300 ग्रॅम सोने पळवण्यात आले. याप्रकरणी गुन्हा दाखल होताच भारती विद्यापीठ पोलिसांनी रात्री उशिरापर्यंत गुन्हेगारांची धरपकड केली होती.
भारती विद्यापीठ पोलिसांनी आठ जणांवर गुन्हा दाखल केला आहे. पोलीस सूत्रांच्या माहितीनुसार, भारती विद्यापीठ परिसरात एका व्यावसायिकाचा सोन्याची नथ बनवण्याचा व्यवसाय आहे. तो घरातच नथ बनवून सराफांना पुरवठा करत होता. त्याचा व्यवसाय वाढल्याने तो परिसरातच एक दुकाने विकत घेण्याच्या विचारात होता.
यामुळे त्याच्याकडे भरपूर पैसे असल्याची माहिती संबंधित गुन्हेगारांना होती. त्यांनी त्याच्यावर वॉच ठेवला होता. दरम्यान, त्याला लुटण्यासाठी एका प्लॅन आखण्यात आला. त्यानुसार आठही गुन्हेगारांनी इन्कम टॅक्स ऑफिसर बनून त्याच्या घरावर धाड टाकली. यावेळी त्याच्या घरातील सर्व कागदपत्रे, कपाटे तपासण्याचा बहाणा करण्यात आला.
घरातील 20 लाखांची रोकड आणि 300 ग्रॅम सोने सील करुन सोबत घेण्यात आले. सराफाने पोलिसांकडे धाव घेऊ नये, म्हणून त्याला अपहरण करुन सोबत घेण्यात आले. सराफाला स्वामी नारायण मंदिरापाशी सोडून देण्यात आले.
यानंतर सर्व ऐवज घेऊन आरोपी पळून गेले. सराफाने दुसऱ्या दिवशी पोलिसांत तक्रार दाखल केली. घटनेचे गांभीर्य लक्षात घेता, भारती विद्यापीठ पोलिसांनी पथके तयार करुन गुन्हेगारांच्या मागावर धाडली होती. रात्री उशिरा यातील काही गुन्हेगार हाती लागले. ही कारवाई पोलीस उपायुक्त सागर पाटील, वरिष्ठ पोलीस निरीक्षक जगन्नाथ कळसकर यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली.