मुंबई – साऊथचा आणखी एक मोठा सुपरस्टार हिंदी चित्रपटसृष्टीत पाऊल ठेवण्याच्या तयारीत आहे. तमिळ चित्रपटांतील प्रसिद्ध अभिनेता सूर्या आता हिंदी चित्रपट करण्यासाठी सज्ज झाला आहे. सध्या सूर्या त्याच्या आगामी ‘कंगुवा’ चित्रपटाच्या शूटिंगमध्ये व्यस्त आहे. या पीरियड ड्रामा चित्रपटाची अनेक दिवसांपासून चाहते वाट पाहत आहेत. दरम्यान, तो लवकरच बॉलिवूड चित्रपटातही दिसणार असल्याची चर्चा आहे.
मीडिया रिपोर्ट्सनुसार, ‘रंग दे बसंती’ आणि ‘भाग मिल्खा भाग’ सारखे चित्रपट बनवणारा राकेश ओम प्रकाश मेहरा त्याच्या ‘कर्ण’ चित्रपटासाठी सूर्यासोबत चर्चा करत आहे. रिपोर्टनुसार, राकेश आणि सूर्या यांच्यात ‘कर्ण’वर काही काल चर्चा सुरू आहे. दोघांमधील या चित्रपटाबाबतची चर्चा सकारात्मक दिशेने सुरू आहे. या दोन भागांच्या महाकाव्याचा भाग होण्यासाठी सूर्या देखील खूप उत्साहित असल्याचे सांगितले जात आहे.
हा चित्रपट ‘महाभारत’वर आधारित असेल, ज्यामध्ये सुर्या मुख्य भूमिकेत दिसणार आहे. अहवालानुसार, हा चित्रपट पॅन इंडिया स्तरावर बनवला जाईल, तसेच अनेक भाषांमध्ये प्रदर्शित करण्याची तयारीही सुरू आहे. 2024 मध्ये चित्रपटाचे शूटिंग सुरू होऊ शकते. सुर्या सध्या दिग्दर्शक सिरुथा शिवासोबत ‘कंगुवा’मध्ये काम करत आहे. या चित्रपटाचे शूटिंग २०२३ च्या अखेरीस पूर्ण होण्याची शक्यता आहे.