लंडन – दक्षिण आफ्रिकेकडून अंडर-19 क्रिकेट विश्वचषक खेळणारा 20 वर्षीय वेगवान गोलंदाज मंडोली खुमालो याला इंग्लंडमध्ये जबर मारहाण करण्यात आली. या मारहाणीनंतर खुमालो कोमात गेला आहे.
मारहाणीच्या घटनेनंतर, खुमालो याला रुग्णालयात दाखल करण्यात आले, जिथे त्याची प्रकृती सध्या स्थिर असल्याचे सांगण्यात येत आहे. 20 वर्षीय क्रिकेटपटूच्या तब्येतीबाबत अपडेट क्वाझुलु-नॅटल इनलँडचे सीईओ जेसन साथियासीलन यांनी क्लब क्रिकेट दक्षिण आफ्रिकेला दिले आहे.
साथियासीलन यांनी क्रिकेट दक्षिण आफ्रिकेला सांगितले की, “आम्हाला या आठवड्याच्या शेवटी एक दुःखद घटना कळली, जी मंडोली खुमालोशी संबंधित आहे. खुमालो याची प्रकृती स्थिर असली तरी गंभीर आहे. त्यांना ब्रिस्टल येथील साउथमीड रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. मंडोली याच्यावर शस्त्रक्रिया झाल्याचे त्यांनी सांगितले. सर्जनच्या म्हणण्यानुसार त्याची शस्त्रक्रिया यशस्वी झाली आहे. मंडोली सध्या कोमात आहे पण त्यातून तो बरा होईल असे डॉक्टरांचे म्हणणे आहे.
साथीसीलनच्या म्हणण्यानुसार, घटनेनंतर खुमालोची आई आणि त्याच्या कुटुंबीयांशी संपर्क साधण्याचे प्रयत्न सुरू आहेत. या कठीण काळात खुमालोच्या आईला इंग्लंडला आणण्याची तयारी सुरू आहे. मंडोलीवरील हल्ला अत्यंत वेदनादायी आणि प्राणघातक आहे, आपण त्याच्यासाठी प्रार्थना केली पाहिजे, असे ते म्हणाले.
मंडोली खुमालो क्वाझुलु नेटल इनलँडचे प्रतिनिधित्व करते. सध्या तो इंग्लंडमधील नॉर्थ पेथरटन क्रिकेट क्लबकडून परदेशी खेळाडू म्हणून खेळत होता. खुमालो 2020 मध्ये दक्षिण आफ्रिकेच्या 19 वर्षांखालील संघाचा देखील भाग होता.