नवी दिल्ली : लघु, सुक्ष्म, व मध्यम उद्योगांसाठी केंद्र सरकार मदतीचे पॅकेज तयार करीत असून त्याला लवकरच अंतिम स्वरूप दिले जाईल असे या विभागाचे मंत्री नितीन गडकरी यांनी म्हटले आहे. करोनामुळे हे क्षेत्र सर्वाधिक अडचणीत आले असून या क्षेत्रातील उद्योग पुन्हा उभारी धरावेत यासाठी सरकार प्रयत्नशील आहे असे त्यांनी म्हटले आहे.
या क्षेत्राला कशा प्रकारे मदत करता येऊ शकेल याची यादी आम्ही वित्त मंत्रालयाकडे पाठवली आहे. तसेच ही यादी पंतप्रधान कार्यालयाकडेही पाठवण्यात आली आहे. या क्षेत्राला जितकी शक्य आहे तितकी मदत आम्ही देऊ करीत आहोत असे गडकरी यांनी उद्योग क्षेत्रातील एका शिष्टमंडळाशी बोलताना सांगितले. या क्षेत्राला वित्त पुरवठा करण्यासाठी सकारात्मक निर्णय घेतले जातील असे संकेतही केंद्र सरकारकडून देण्यात आले आहेत.