Breaking News – युको बॅंकेतील (bank) सायबर घोटाळ्याच्या पार्श्वभूमीवर अर्थ मंत्रालयाने (Ministry of Finance) देशातील सर्व सरकारी बॅंकांना (bank) त्यांच्या डिजिटल ऑपरेशनशी संबंधित प्रणाली आणि सायबर सिक्युरिटी मजबूत करण्यासाठी उपाययोजना करावी आणि सध्याच्या व्यवस्थेचा आढावा घ्यावा अशी सुचना केली आहे.
बॅंकांनी सायबर फ्रॉडच्या संबंधात कडेकोट सावधगिरी बाळगली पाहिजे आणि भविष्यातील सायबर धोक्यांसाठी सज्ज असले पाहिजे, अशी सुचना या बॅंकाना करण्यात आली आहे. वित्तीय क्षेत्रातील वाढत्या डिजिटायझेशनच्या पार्श्वभूमीवर वित्त मंत्रालय आणि आरबीआय नियमित अंतराने या पैलूवर बॅंकांना सावध करीत आहेत.
गेल्या आठवड्यात, कोलकाता येथल युको बॅंकेच्या खातेदारांना तात्काळ पेमेंट सर्व्हिसद्वारे 820 कोटी रुपयांचे चुकीचे क्रेडिट नोंदवले गेले होते त्यामुळे मोठीच खळबळ उडाली होती. एकाच वेळी अनेक खात्यांमध्ये असे कोट्यावधी रूपये जमा झाल्याचे दिसल्याने बॅंकेचे अधिकारीही चक्राऊन गेले होते.
आयएमपीएस या सिस्टीममधून हा घोळ झाला होता. ही सिस्टीम म्हणजे कोणत्याही हस्तक्षेपाशिवाय रिअल-टाइम इंटरबॅंक इलेक्ट्रॉनिक फंड ट्रान्सफर सिस्टम आहे. हा प्रकार लक्षात आल्यानंतर युको बॅंकेने ज्या खात्यावर असे पैसे ट्रान्स्फर झाले त्यांची खाती ब्लॉक केली आणि 820 कोटी रुपयांपैकी 649 कोटी रुपये वसूल करण्यात यश मिळवले. ही चूक तांत्रिक स्वरूपाची होती की, हा हॅकिंगचा प्रकार होता हे अजून लक्षात आलेले नाही.