मुंबई – 2023चा गानसम्राज्ञी लता मंगेशकर पुरस्कार ज्येष्ठ गायक सुरेश वाडकर यांना जाहीर झाल्याची घोषणा सांस्कृतिक कार्यमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी आज केली. तसेच सांस्कृतिक कार्य संचालनालयाच्या वतीने दरवर्षी देण्यात येणाऱ्या जीवनगौरव पुरस्कारांच्या रकमेत दुप्पट वाढ करण्यात आली असून राज्य सांस्कृतिक पुरस्काराची रक्कम तिप्पट करण्यात आली आहे.
सांस्कृतिक कार्यमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी सांस्कृतिक कार्य संचालनालयामार्फत देण्यात येणाऱ्या राज्य सांस्कृतिक पुरस्कार 2022 व 2023 ची ही घोषणा केली आहे. राज्य सांस्कृतिक पुरस्कारांमध्ये एकूण बारा वर्गवारी असून, यामधील प्रत्येक वर्गवारी मध्ये दोन वर्षाचे दोन पुरस्कार जाहीर झाले आहेत.
2023 चा गानसम्राज्ञी लता मंगेशकर पुरस्कार ज्येष्ठ गायक सुरेश वाडकर यांना जाहीर झालेला आहे. संगीत व गायन क्षेत्रातील सातत्यपूर्ण आणि अमूल्य योगदान देणाऱ्या कलाकारास हा पुरस्कार देण्यात येतो. तसेच भारतरत्न पंडित भीमसेन जोशी शास्त्रीय संगीत जीवन गौरव पुरस्कार 2022 पुरस्कारासाठी पं. उल्हास कशाळकर यांचे नाव घोषित झाले असून,
2023च्या पुरस्कारासाठी पं. शशिकांत (नाना)श्रीधर मुळ्ये यांची घोषणा करण्यात आली आहे. शास्त्रीय संगीतासाठी ज्यांनी आपले जीवन समर्पण केले आणि शास्त्रीय संगीत क्षेत्राची सेवा केली, त्या कलाकारांच्या योगदानाबद्दल हा पुरस्कार प्रदान करण्यात येतो. नटवर्य प्रभाकर पणशीकर रंगभूमी जीवन गौरव पुरस्काराच्या 2022साठी सुहासिनी देशपांडे, तर 2023साठी अशोक समेळ यांना पुरस्कार घोषित झाला आहे.
मराठी रंगभूमीवर ज्यांनी आपल्या कार्यकर्तृत्वाचा ठसा उमटवला आहे, अशा कलाकारांना या पुरस्काराने गौरविण्यात येते. संगीताचार्य अण्णासाहेब किर्लोस्कर संगीत रंगभूमी जीवनगौरव 2022चा पुरस्कार नयना आपटे, तर 2023च्या पुरस्कारासाठी पं. मकरंद कुंडले यांची निवड झाली आहे.
विभाग – 2022 – 2023
नाटक – वंदना गुप्ते – ज्योती सुभाष
उपशास्त्रीय संगीत – मोरेश्वर निस्ताने – ऋषिकेश बोडस
कंठ संगीत – अपर्णा मयेकर – रघुनंदन पणशीकर
लोककला – हिरालाल रामचंद्र सहारे – कीर्तनकार भाऊराव थुटे महाराज
शाहीरी – जयंत अभंगा रणदिवे – राजू राऊत
नृत्य – लता सुरेंद्र – सदानंद राणे
चित्रपट – चेतन दळवी – निशिगंधा वाड
कीर्तन प्रबोधन – लेखिका प्राची गडकरी – अमृत महाराज जोशी
वाद्य संगीत – पं. अनंत केमकर – शशिकांत सुरेश भोसले
कलादान – संगीता राजेंद्र टेकाडे – यशवंत रघुनाथ तेंडोलकर
तमाशा – बुढ्ढणभाई बेपारी (वेल्हेकर) – उमा खुडे