Uddhav Thackeray – शिवसेनेत फूट पडल्यापासून शिंदे आणि ठाकरे गटांत वारंवार संघर्ष होत असल्याचे पाहायला मिळत आहे. आता या दोन्ही गटात पुन्हा एकदा नव्या कारणामुळे वादाला सुरुवात झाली आहे.
मुंब्य्रातील शाखेच्या मुद्द्यावरून ठाकरे गट आणि शिंदे गट हे आमनेसामने आले असून राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. यामुळे पोलिसांकडून मोठ्या प्रमाणात फौजफाटा तैनात करण्यात आला आहे.
मुंब्रयातील शाखा स्थळी सायंकाळी उद्धव ठाकरे पोहचले असताना त्यांना शाखा स्थळी जाण्यास पोलिसांनी रोखले. यावेळी उद्धव ठाकरे यांनी पोलिसांशी संवाद साधला.
यावेळी पोलिसांनी सुरक्षेच्या कारणास्तव त्यांना पुन्हा वाहनातच बसण्याची विनंती केली. त्यांनतर काही वेळेनंतर उद्धव ठाकरेंचा ताफा शाखा स्थळी पोहचला खरा मात्र, त्यांना बॅरिकेट्सपर्यंतच पोहचता आले.
दरम्यान, उद्धव ठाकरे हे मुंब्य्रात येणार असल्याकारणाने पोलिसांनी खबरदारीचा उपाय म्हणून ठाण्यापासून मुंब्य्रापर्यंत मोठा बंदोबस्त ठेवला होता. मुंब्य्रात 500हून अधिक पोलीस तैनात करण्यात आले आहेत. तसेच 3 एसआरपीएफच्या तुकड्या, 2 दंगल नियंत्रण पथक, 3 डीसीपी, 9 पोलीस निरीक्षक आणि इतर कर्मचारी अधिकारी यावेळी तैनात होत्या.
उद्धव ठाकरेंचा हल्लाबोल !
खरा बुलडोजर काय असतो हे दाखवायला आलो होतो, पण पोलिसांनी त्यांच्या मालकाचे संरक्षण केले. नेभळटांनो तुमच्यात हिंमत असेल तर पोलिसांना बाजूला ठेवा आणि समोर या, मग दाखवतो, असे थेट आव्हान उद्धव ठाकरे यांनी एकनाथ शिंदे यांना दिले.
उद्धव ठाकरे म्हणाले, पोलिसांनी आज या चोरांचे रक्षण केले, पण या चोरांनी मधमाशीच्या पोळाला डिवचले आहे, यांना फोडल्याशिवाय राहणार नाही. येत्या निवडणुकीवेळी या चोरांचे डिपॉजिट जप्त करा, असे उद्धव ठाकरेंनी कार्यकर्त्यांना आवाहन केले.