नवी दिल्ली : सामाजिक कार्यकर्ते सोनम वांगचुक यांच्या लडाखमधील आंदोलनाचा आज पाचवा आणि शेवटचा दिवस आहे. वांगचुक लडाख वाचवण्यासाठी आंदोलन करत आहेत. लडाखमध्ये बर्फवृष्टी सुरू असून तेथील गोठवणाऱ्या थंडीतही लडाखच्या विविध प्रश्नांसाठी सोनम वांगचुक यांचे उपोषण सुरूच आहे. लडाखचा सहाव्या अनुसूचीमध्ये समावेश करण्याची मागणी त्यांनी केली आहे. तसेच लडाखच्या संरक्षणासंदर्भात अनेक मुद्द्यांसाठी वांगचुक यांचे उपोषण सुरू असल्याचे सांगण्यात येत आहे.
सोनम वांगचुक यांनी आज उपोषणाच्या शेवटच्या दिवशी संपूर्ण देशातील पर्यावरण प्रेमींना एका दिवसाचे उपोषण करण्याचे आवाहन केले आहे. तुम्ही तुमच्या शहरातून देशाच्या कोणत्याही भागातून एका दिवसासाठी उपोषण करुन पर्यावरण वाचवण्यासाठीच्या या मोहिमेमध्ये सामील होऊ शकता, असे त्यांनी संगितले होते. सोशल मीडियाद्वारे तुमच्या उपोषणाची माहिती सर्व लोकांपर्यंत पोहोचवा असे आवाहनही त्यांनी जनतेला केले आहे.
सोनम वांगचुक यांच्या आंदोलनाची धग देशभरात पोहोचली आहे. वांगचुक यांनी त्यांच्या व्हिडीओमध्ये 30 जानेवारी रोजी सर्व लोकांना त्यांच्या मोहिमेत सहभागी होण्याचे आवाहन केले आहे. त्यांनी ट्विटरवर व्हिडीओ शेअर करत हे आवाहन केले आहे. यानंतर त्यांच्या समर्थनार्थ हिमाचलचे सामाजिक कार्यकर्ते 30 जानेवारीला शिमलामध्ये एक दिवसीय उपोषण करत आहेत.
हाडं गोठवणाऱ्या थंडीत सोनम वांगचुक उपोषण करत आहे. लडाखमधील दोन तृतीयांश हिमनद्या नामशेष होण्याच्या मार्गावर आहेत. पर्यावरण संवर्धनाच्या मुद्यावरुन गेल्या चार दिवसांपासून सोनम वांगचुक उपोषणाला बसले आहेत. लडाखच्या थंड हवामानात सोनम वांगचुक यांचे उपोषण सुरू आहे. बर्फवृष्टी सुरू असतानाही वांगचुक यांनी आपले उपोषण सुरुच ठेवले आहे.