नवी दिल्ली – भारतीय क्रिकेट संघातील धडाकेबाज खेळाडू ऋषभ पंतच्या गाडीचा गेल्या महिन्यात (30 डिसेंबर 2022) भीषण अपघात झाला. या अपघातात ऋषभ पंत गंभीर जखमी झाला आहे. दिल्लीहून ऋषभ घरी येत असताना त्याच्या कारला हा भीषण अपघात झाल्याचे सांगण्यात येत आहे. दिल्ली-डेहराडून महामार्गावर रेलिंगला धडकल्यानंतर ऋषभच्या कारला आग लागली. त्यानंतर परिसरातील उपस्थितांनी त्याला गाडीतून बाहेर काढत रुग्णालयात दाखल केले.
या अपघातात ऋषभच्या डोक्याला, पाठीला आणि पायाला गंभीर दुखापत झाली असून, सध्या तो हॉस्पिटलमध्ये उपचार घेत आहे. दरम्यान, आता महिनाभराच्या उपचारांनंतर रिषभ पंतच्या प्रकृतीबाबत महत्त्वाची माहिती समोर आली आहे. पंतला हॉस्पिटलमधून डिस्चार्ज कधी मिळणार, याबाबत सांगितले आहे. एका प्रसिद्ध वृत्तसंस्थेने याबद्दल माहिती दिली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, सध्या ऋषभ पंतच्या तब्येतीत चांगली सुधारणा होत आहे. ऋषभ पंतवरील शस्त्रक्रिया यशस्वी ठरली आहे. याच आठवड्यात ऋषभ पंतला हॉस्पिटलमधून डिस्चार्ज मिळू शकतो. अशी गुड न्यूज मेडिकल टीमने दिली आहे. तसेच, दुसऱ्या सर्जरीनंतर पूर्णपणे फिट होण्यासाठी ऋषभला 4 ते 5 महिने लागतील. त्यानंतर ऋषभचे रिहॅब आणि ट्रेनिंग सुरु होईल. मैदानावर परतून प्रॅक्टिस सुरु करण्यासाठी आणखी दोन महिने लागू शकतात. असं देखील यावेळी सांगण्यात आलं आहे.