सोलापूर – सोलापूर जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघावर प्रशासक म्हणून माजी सरव्यवस्थापक शिवराम पापळ यांच्या प्रशासक म्हणून झालेल्या निवडीला उच्च न्यायालयात आव्हान देण्यात आले आहे.
संघावरील शासकीय प्रशासक मंडळ दूर करून पापळ यांची नियुक्ती करण्यात आली आहे. शासकीय प्रशासक मंडळ हटवण्याच्या निर्णयाला जिल्ह्यातील दूध उत्पादक शेतकऱ्यांचा विरोध असून संघ बचाव समितीने याबाबत उच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे.
आर्थिक स्थिती डबघाईस आलेल्या सोलापूर जिल्हा सहकारी दूध संघावरील शासकीय प्रशासक मंडळ गेल्या आठवड्यात दूर करण्यात आले. दुग्धविकास मंत्री सुनील केदार यांच्या निर्देशानुसार पदुमचे पुणे विभागाचे उपनिबंधक डॉ. सुनील कदम यांनी संघाचे माजी व्यवस्थापक शिवराम पापळ यांची प्रशासक म्हणून नियुक्ती केली आहे. या नियुक्तीला दूध संघ बचाव समितीकडून उच्च न्यायालयात आव्हान देण्यात आले आहे.
यापूर्वीही संघावरील शासकीय प्रशासक मंडळ बदलण्याचा प्रयत्न झाला होता. मात्र त्यावेळी जिल्ह्यातील दूध उत्पादक शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाणात विरोध दर्शवला व त्याला जिल्ह्यातील काही सजग राजकारण्यांनी पाठबळ दिले. त्यामुळे तत्कालीन तीन सदस्य शासकीय प्रशासक मंडळाला कायम ठेवण्यात आले.
सोलापूर जिल्हा सहकारी दूध संघाचे संचालक मंडळ बरखास्त करून संघावर तीन सदस्य प्रशासकीय मंडळ नेमण्यात आले. या मंडळाकडून संघाच्या कारभार व संघाच्या थकबाकीबाबत कठोर कारवाई सुरू करण्यात आली होती.