चंदीगड – हरियाणातील जज्झर येथे आज उपमुख्यमंत्री दुष्यंत चौताला यांचा कार्यक्रम होता. त्या कार्यक्रमात घुसून तो कार्यक्रम हाणून पाडण्याचा प्रयत्न शेतकऱ्यांनी आज केला. त्यावेळी त्यांना रोखण्यासाठी पोलिसांना लाठीमार आणि पाण्याच्या फवाऱ्याचा वापर करावा लागला.
हा कार्यक्रम सरकारी कॉलेजच्या प्रांगणात आयोजित करण्यात आला होता. तेथे मोठ्या प्रमाणावर शेतकरी जमले होते. काहींनी पोलिसांनी उभारलेल्या बॅरिकेडवरून उड्या मारून आत शिरण्याचा प्रयत्न केला.
सरकारच्या मंत्र्यांना कोणताही कार्यक्रम करू द्यायचा नाही तसेच भाजप नेत्यांनांही अटकाव करायचा असे सत्र शेतकऱ्यांनी अवलंबले आहे. गुरूवारी भाजपचे नेते कर्नल इंद्री यांचाही कार्यक्रम उधळून लावण्याचा प्रयत्न शेतकऱ्यांनी केला.
दिल्लीत कृषी कायदे रद्द करावेत या मागणीसाठी शेतकऱ्यांचे आंदोलन सुरू आहे. त्या आंदोलनाच्या समर्थनार्थ हरियाणातील सरकारच्या मंत्र्यांच्या व नेत्यांच्या विरोधातही शेतकरी नियमीतपणे रस्त्यावर उतरून आंदोलने करीत आहेत.