पुणे – मी स्वतःला कधीच स्त्री-पुरुष या चौकटीतून पाहिले नाही. आजच्या मुलींनीही हाच विचार घेऊन पुढे जावे. सावित्रीबाईंच्या कार्यात महात्मा फुले यांचे पाठबळ होते. तसेच ज्यावेळी महिलांच्या मागे पुरुष उभे राहतात तेव्हा, अशा पुरुषांचाही समाजाला पुढे नेण्यात वाटा असतो, असे मत लेफ्टनंट जनरल डॉ. माधुरी कानिटकर यांनी व्यक्त केले.
सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या विद्यार्थी विकास मंडळातर्फे देण्यात येणारा 2022 चा सावित्रीबाई फुले सन्मान सोहळा बुधवारी पार पडला. यंदाचा सावित्रीबाई फुले सन्मान लेफ्टनंट जनरल माधुरी कानिटकर, लता करे, पद्मश्री डॉ. कल्पना सरोज, बागेश्री मंठाळकर, पूजा कदम आणि गोदावरी मुंडे या विविध क्षेत्रांत आदर्श निर्माण करणाऱ्या महिलांना प्रदान करण्यात आला.
यावेळी कुलगुरू डॉ. नितीन करमळकर, प्र-कुलगुरू डॉ. एन. एस. उमराणी, व्यवस्थापन परिषदेचे सदस्य राजेश पांडे, प्रसेनजीत फडणवीस, अधिष्ठाता डॉ. मनोहर चासकर, डॉ. पराग काळकर, विद्यार्थी विकास मंडळाचे संचालक डॉ. संतोष परचुरे, व्यवस्थापन परिषदेच्या सदस्य तथा सन्मान शोध समिती अध्यक्ष सुनेत्रा पवार उपस्थित होत्या.
राजेश पांडे म्हणाले, “समाजात जे चांगलं घडतंय त्याचं प्रतिबिंब विद्यापीठात उमटावं. विद्यापीठाने आजवर अनेक छोट्या छोट्या प्रयोगातून उपक्रमशीलता जोपासली आहे. या सर्व गोष्टींतून विद्यार्थ्यांनी प्रेरणा घ्यावी व स्वतःच्या आणि राष्ट्राच्या प्रगतीत आपल योगदान द्यावे.’गौरवमूर्तींच्या निवड समितीतील सदस्य डॉ. माधवी रेड्डी व डॉ. शुभदा घोलप यावेळी उपस्थित होत्या. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन स्वामीराज भिसे यांनी केले.
विद्यार्थ्यांचा विकास हा केवळ शैक्षणिकदृष्ट्या नाही, तर एक माणूस म्हणून व्हावा. त्यासाठी समाजात जे चांगलं घडतंय त्याची त्यांना माहिती करून देणे विद्यापीठाचे काम आहे. विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास या अशा कार्यक्रमाच्या माध्यमातून होतो, त्यांना लढण्याची प्रेरणा मिळते व समाजाशी त्यांची नाळ जोडली जाते.
-डॉ. नितीन करमळकर, कुलगुरू