जाधववाडी – पिंपरी-चिंचवड शहरातील सोसायटी धारकांसाठी पहिल्यांदाच आयोजित केलेल्या स्नेहसंमेलनाला तब्बल 15 हजारांहून अधिक सदनिकाधारकांनी सहभाग घेतला. या संमेलनामध्ये पायाभूत सोयीसुविधांसाठी भेडसावणार्या समस्या आणि आव्हानांवर चर्चा करण्यात आली.
चिखली-मोशी-पिंपरी-चिंचवड सोसायटी फेडरेशनच्या पुढाकाराने स्नेहसंमेलन भरविण्यात आले. या वेळी आमदार महेश लांडगे, भोसरी एमआयडीसी पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेंद्र निकाळजे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते.
सोसायटी फेडरेशनचे अध्यक्ष संजीवन सांगळे म्हणाले की, पिंपरी चिंचवड शहरातील सर्व सोसायटीधारकांना एका छताखाली आणून, सर्वांना एकसंघ करून सरकारी यंत्रणा आणि आपल्या सर्व प्रस्थापितांना आपली ताकद दाखवणे गरजेचे होते. सोसायटी फेडरेशनचा जन्मच सोसायटीधारकांच्या समस्या सोडविण्यासाठी सोसायटीधारकांच्या न्याय हक्कांसाठी संघर्ष करण्यासाठी झालेला आहे.
आमचे फेडरेशन समाजकारण करते सोसायट्यांसाठी काम करते कोणतेही राजकारण करत नाही. फेडरेशन हे अराजकीय काम करते. फेडरेशन कोणत्याही राजकीय नेत्याला किंवा पक्षाला बांधील नाही फेडरेशन हे कोणत्याही राजकीय पक्षाची किंवा नेत्यांची भूमिका किंवा त्याला समर्थन करत नाही असेही सांगळे यांनी सांगितले. आजपर्यंत जी, जी कामे आपण आमदार महेश लांडगे यांना सांगितली ती सर्व कामे त्यांनी पूर्ण केलेली आहेत. त्यामध्ये ओला कचरा उचलणे असेल, पाण्याची समस्या असेल, राज्याच्या अधिवेशनामध्ये सोसायटीधारकांचे प्रश्न मांडने असेल, सोसायटीच्या जवळ होणारे कचरा संकलन केंद्र दुसरीकडे हटवणे असेल, असा अनेक मुद्द्यांवर आमदार लांडगे यांनी सहकार्य केले. त्यामुळे आम्ही त्यांना सपोर्ट करतो, असा दावाही सांगळे यांनी केला.
मी सोसायटीधारकांच्या सोबत – आमदार लांडगे
आमदार लांडगे यांनी त्यांची भूमिका मांडताना सोसायटी फेडरेशन हे अराजकीय आहे. परंतु, सोसायटी फेडरेशनच्या कुठल्याही कामांमध्ये कोणत्याही प्रकारची माझी मदत लागत असेल तर ती मी पूर्वीपासून करत आलेलो आहे आणि पुढे देखील करणार आहे. सोसायटी फेडरेशनला कोणी वैयक्तिक त्रास देत असेल बिल्डर असतील, स्थानिक स्वराज्य संस्थेचे अधिकारी असतील किंवा इतर कोणी असेल असे कोणी सोसायटी फेडरेशनच्या पदाधिकार्यांना त्रास देत असेल तर मी तुमच्या पाठीशी आहे.