नागठाणे – बोरगाव (ता. सातारा) येथील सामाजिक कार्यकर्त्यांचे प्रसंगावधान अन् पोलिसांनी दाखविलेली तत्परता यामुळे एका वृद्धास स्वतःचे घर गवसले. गावापासून शेकडो किलोमीटर अंतर दूर आलेल्या या वृद्धास अखेर आपल्या नातेवाईकांचे दर्शन घडले.
शनिवारी सकाळी 11 च्या सुमारास बोरगाव येथील सचिन राजेंद्र कामटे यांना पुणे- बंगळूर महामार्गालगत 75 वर्षाचे एक वृद्ध बेवारस स्थितीत आढळले. त्यांनी संबंधितांची विचारपूस केली. त्यावरून ते घरापासून दुरावल्याचे लक्षात आले. श्री. कामटे यांनी वृद्धास बोरगाव पोलिस ठाण्यात आणले. पोलिसांनी त्यांना विश्वासात घेऊन अधिक चोैकशी केली. तेव्हा संबंधिताचे नाव हे रामचंद्र कचरू थोरात असल्याचे समजले. थोरात हे रोटेगाव (ता. वैजापूर, जि. औरंगाबाद) येथील रहिवासी असल्याची माहितीही समोर आली. त्यांच्याकडून पोलिसांनी कुटुंबाची माहिती घेतली असता त्यांचे चिरंजीव रवींद्र हे कोल्हापूर येथील भूविज्ञान व खनिकर्म संचालनालयात चालक
म्हणून नोकरीस असल्याचे समजले. त्यानंतर पोलिसांनी तत्परतेने त्यांच्या चिरंजीवाशी संपर्क साधला. यावेळी थोरात हे हरवले असल्याची नोंद करवीर (जि. कोल्हापूर) पोलिस ठाण्यात झाली असल्याचे त्यांनी नमूद केले.
थोरात यांचे नातेवाईक बोरगाव येथे पोचेपर्यंत बोरगाव येथील सामाजिक कार्यकर्त्यां व महिला समितीच्या अध्यक्षा पद्मजा विरेंद्र कळसकर व सचिन राजेंद्र कामटे, दत्तात्रय ढाणे यांनी त्यांची काळजी घेतली. बोरगाव पोलिस ठाण्याचे सहायक पोलिस निरीक्षक चंद्रकांत माळी व त्यांच्या सहकाऱ्यांनीही याकामी विशेष परिश्रम घेतले. थोरात यांचे कुटुंबीय, नातेवाईक यांनी पोलिस, तसेच सामाजिक कार्यकर्त्यांना धन्यवाद दिले.