शेतकऱ्यांना शासकीय मदतीची लागली आस

नेवासा  – नेवासा तालुक्‍यात खरीप हंगामातील पिकांचे कोट्यवधींचे नुकसान झाले आहे. युद्धपातळीवर नुकसानीचे पंचनामे होत आहेत. शासनाच्या मदतीकडे शेतकरी वर्ग आस लावून बसला आहे.

मागील रब्बी हंगामात शेतकऱ्यांची पिके पावसाअभावी गेली. त्याची विमा रक्कम अद्यापही अनेक शेतकऱ्यांना मिळालेली नाही. यावेळी तर खरिपातील पिकांना पावसाने चांगलेच झोडपले आहे. त्यामुळे या पिकांच्या नुकसान भरपाईच्या प्रतीक्षेत शेतकरी आहेत. सततच्या पावसाने शेतीचे मोठे नुकसान झाले आहे. खरीप हंगामप्रसंगी जेमतेम झालेल्या पावसाच्या ओलीवर शेतकऱ्यांनी सोयाबीन, मका, बाजरी, भुईमूग, तूर आदींसह चारा पिकांची पेरणी केली होती.

पावसाने ओढ दिल्याने उत्पन्नात घट होईल. मात्र झालेला खर्च वसूल होईल, अशी शेतकऱ्यांना आशा होती. पण ही पिके काढणीला आली असता पावसाने त्यांची नासाडी केली. तालुक्‍यातील अनेक गावांतील शेतांत पावसाच्या पाण्याने तळी साचली आहेत. परतीचा पाऊस व पाटपाणी चालू असल्याने शेतीच्या कामाला सणासुदीच्या काळात खीळ बसली आहे. तालुक्‍यात कपाशीची मोठ्या प्रमाणात लागवड झालेली आहे. सोयाबीन व मकाची पेरणी मोठी आहे. मात्र पावसाने वेचणीला आलेल्या कापशीची वाताहत झाली.

बोंडे काळी, तर कपाशीची झाडे लाल पडली आहेत. उरलीसुरली पिकेही परतीच्या पावसाने हिरावून घेतली आहेत. पावसाने शेतातील पिकांना मोड फुटलेले आहे. सध्या शेतात पाणी असल्याने रब्बीचे नियोजनही कोलमडणार आहे. त्यामुळे महसूल व कृषी विभागाने तातडीने सरसकट पंचनामे करावेत, अशी मागणी होत आहे. कामगार तलाठी, ग्रामसेवक, कृषी सहायकांकडून पंचनामे करण्यात येत आहेत.

शासनाकडून किती मदत मिळू शकते, याविषयी चर्चा झडत आहेत. या तुटपुंज्या मदतीकडे व पीकविमा रकमेकडे शेतकरी आस लावून बसला आहे. रब्बीमधील लवकर पेरणी केलेली हरभऱ्या सारखी पिके पावसाने वाहून गेली आहेत. त्यांचा पंचनाम्यात समावेश नसल्याचे सांगण्यात आले. गतवर्षी पाऊस नसल्याने पिके आली नाही आणि यंदा पावसाने आलेली पिके वाया गेल्याने परिस्थिती गंभीर बनल्याचे शेतकरी सांगत आहे. खरीप गेला. आता रब्बीचे कसे होणार, या चिंतेने शेतकरीवर्ग हबकला आहे.

Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)