पुणे – पुणे पोलिसांच्या सामाजीक सुरक्षा विभागाने बालेवाडी परिसरात छापेमारी करत हाय प्रोफाईल सेक्स रॅकेटचा पर्दाफाश केला आहे. येथून तब्बल दहा मुलींची सुटका करण्यात आली आहे. तर पाच दलालांवर गुन्हे दाखल झाले आहेत. काही दिवसांपुर्वीच कोरेगाव पार्क परिसरात एका तारांकीत हॉटेलमध्ये सापळा लावून राजस्थानी अभिनेत्री आणि दोन उझबेकिस्तानच्या मुलींना ताब्यात घेण्यात आले होते. या कारवाईमुळे सेक्स रॅकेटमधील दलालांचे धाबे दणाणले आहेत. बुधवारी रात्रीच्या कारवाईत सहा राज्यातील मुलींचा समावेश आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनूसार, रॉकी कदम, राहुल उर्फ मदन संन्यासी, दिनेश उर्फ मामा, नदिम आणि रोशन यांच्यावर चतुश्रृंगी पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. पोलिसांनी दिलेल्या माहितीनूसार, मागील काही दिवसांत शहरातील ऑन लाईन वेश्या व्यवसायासंदर्भात तक्रारी वाढल्या होत्या. त्यानूसार खबर काढली असता, बालेवाडी परिसरात मोठ्या प्रमाणात हा व्यवसाय सुरु असल्याची खबर मिळाली. बालेवाडी परिसरात काही हॉटेल आणि सदनिकांमध्ये हा व्यवसाय चालत होता.
सामाजीक सुरक्षा विभागाने सापळा रचून मिटकॉन महाविद्यालयजवळील हॉटेल टॅग हाऊस येथील तीन खोल्यांवर छापा टाकत, पॅनकार्ड क्लब रस्त्यावरील स्नेह अपार्टमेंट आणि लक्ष्मीनगर येथील द विला हॉटेलमध्ये छापा टाकला. यामध्ये दिल्ली राज्यातील गुडगाव आणि नजबगड, उत्तरप्रदेशातील आझमगड, पश्चिम बंगालमधील कोलकत्ता व काशिपुर, आसामधील लिखापानी, महाराष्ट्रातील नवी मुंबई, अंधेरी व वाशी, गुजरात वापी आणि मध्य प्रदेशातील इंदोर येथील या मुलींची सुटका करण्यात आली. या मुलींना पैशाचे आमिष दाखवून त्यांच्याकडून वेश्या व्यवसाय करुन घेतला जात होता. ही कारवाई वरिष्ठ पोलीस निरीक्षक भरत जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली.