सामाजिक भान : ऋत्विजाकडून कॅन्सर पीडितांसाठी केसांचे दान

कोणत्याही महिलेचे किंवा मुलीचे सौंदर्य हे तिच्या केसांवर जास्त अवलंबून असते असं म्हटलं जातं…पण विचार करा जर महिलेकडे किंवा मुलीकडे केसच नसतील तर विचार देखील करवत नाही ना…पण आपण या समाजाचे काही तरी देणं लागतो या भावनेतून एका मुलीने आपल्या याच सौंदर्याचा त्याग केला आहे. होय, ऋत्विजा मून असे या मुलीचे नाव आहे. ऋत्विजाने एवढं मोठं धाडस हे कॅन्सपीडितांसाठी केले आहे.

डिजिटल प्रभातने ऋत्विजा सोबत सवांद साधला. ऋत्विजा म्हणाली, मी कधी विचारही केला नव्हता कि कॅन्सर पीडितांसाठी मी माझे केस दान करेल. पण सोशल मीडियावर बघत होते. कॅन्सरमुळे महिलांचा जीव जातोय. आणि केमोथेरपीचे उपचार घेताना त्या रुग्णांच्या डोक्‍यावरील केस जातात. हे अनेक रूग्णांना अत्यंत त्रासदायक वाटते. मला माझ्या आईने विचारले तू केस दान करशील का? पण तेव्हा मी स्कूल’मध्ये जायचे, क्‍लासला जायचे त्यामुळे मी बाहेर कशी जाणार, लोक काय म्हणतील ? हे सगळे प्रश्न मला पडले. हा सर्व विचार केल्यानंतर मी आईला नाही म्हटले. दोन महिन्यांनंतर बसमधून प्रवास करत असताना मी एका मुलीला बघितलं कि तिच्या डोक्‍यावर केस नव्हते पण ती फिरत होती. मग ती सहज फिरू शकते तर मी का नाही? हा प्रश्न मला पडला. त्यानंतर माझे केस कोणाच्या तरी चेहऱ्यावर हास्य आणतील. हि भावना माझ्या मनात आली आणि मी आईला केस दान करण्यासंदर्भात बोलले.

मागील काही वर्षांपासून कॅन्सर या जीवघेण्या आजाराच्या रुग्ण संख्येत सातत्याने वाढ होताना दिसत आहे. हा आजार आपल्याला झाल्याचे समजताच, व्यक्ती मानसिकदृष्ट्या खचून जातो. ऋत्विजा मून या केवळ 14 वर्षाच्या मुलीने केसांचा त्याग करण्यासारखी अशक्‍य वाटणारी गोष्ट शक्‍य केली आहे. ऋत्विजाने तिचे केस कॅन्सरपीडितांसाठी तयार होणाऱ्या वीगसाठी दान केले आहेत. समाजात कॅन्सरपीडित असणाऱ्या व्यक्‍ती या विश्‍वासाने फिरु शकत नाहीत. कारण त्यांचे डोक्‍यापासून ते भुवयांपर्यंतचे सर्व केस हे कॅन्सरवर उपचारासाठी करण्यात येणाऱ्या केमोथेरपी दरम्यान जातात. त्यातून समोर आलेल्या त्यांच्या रुपाकडे समाजाचा पाहण्याचा दृष्टीकोनही वेगळा असतो. त्यामुळे त्यांना समाजात विश्‍वासाने फिरता यावे, सर्वसामन्यांसारखे जगता यावे यासाठी ऋत्विजाने केस दान करण्याचा निर्णय घेतला.

आपल्या केसांचा त्याग इतरांसाठी करणे हे कोणत्याही महिलेला किंवा मुलीसाठी सोपी गोष्ट नाही परंतु, 14 वर्षाच्या ऋत्विजाने हे धाडस करत समाजात एक वेगळा आदर्श निर्माण केला आहे. सध्या तिच्या या धाडसाचे कौतूक तर होत आहे परंतू, या कौतूकाला भुलून न जाता समाजासाठी मला आणखी खुप काही करायचे आहे असे ऋत्विजाने म्हटले आहे. ऋत्विजा, तुझ्या संवेदनशीलतेला सलाम!

-किरण दीक्षित

Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)