कॉंग्रेसच्या मंत्र्यांची यादी रखडल्याने विलंब
मुंबई मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील राज्य मंत्रिमंडळाच्या बहुप्रतीक्षित विस्तारासाठी 30 डिसेंबरचा मुहूर्त मिळाला आहे. कॉंग्रेसच्या मंत्र्यांची यादी रखडल्याने विस्ताराला विलंब लागत असल्याची जोरदार चर्चा आहे.
विधिमंडळाचे अधिवेशन समाप्त झाल्यानंतर लगेचच म्हणजे 23 किंवा 24 डिसेंबरला मंत्रिमंडळ विस्तार होईल, असे आधीचे वृत्त होते. मात्र, विस्तार आणखी लांबल्याची माहिती आता पुढे आली आहे. मंत्रिमंडळ विस्ताराचा सस्पेन्स कायम असल्याच्या पार्श्वभूमीवर सोमवारी सायंकाळी उद्धव आणि राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांची बैठक झाली.
त्यांच्यात सुमारे तासभर झालेल्या चर्चेचा तपशील समजू शकला नाही. त्या भेटीनंतर राष्ट्रवादीच्या सुत्रांनी विस्ताराच्या मुहूर्ताची तारीख सांगितली. राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांचे उपमुख्यमंत्री म्हणून कमबॅक होणार असल्याचेही त्या सुत्रांनी सूचित केले.
दरम्यान, उद्धव यांच्याशी चर्चा करण्याआधी शरद पवार यांनी केलेल्या वक्तव्यामुळे मंत्रिमंडळाचा विस्तार कॉंग्रेसमुळेच रखडल्याच्या बाबीवर शिक्कामोर्तब झाले.
राष्ट्रवादीच्या मंत्र्यांची यादी तयार आहे का, असा प्रश्न पत्रकारांनी विचारला. त्यावर पवार उत्तरले, निर्णय घेण्यासाठी आमचा पक्ष फार वेळ घेत नाही. कुणाची परवानगी घेण्यासाठी आम्हाला कुठे जावे लागत नाही, अशी मिश्कील टिप्पणही त्यांनी केली.