पुणे – करोना संकट काळात महापालिकेच्या आवाहनाला प्रतिसाद देत पुणेकरांनी सलग दुसऱ्या वर्षी सामाजिक बांधिलकी जपत पर्यावरणपूरक गणेशोत्सव साजरा केला. सुमारे 284 मूर्ती संकलन केंद्रांवर सुमारे 1 लाख 6 हजार 316 मूर्तींचे संकलन, तर फिरत्या विसर्जन हौदांमध्ये 1 लाख 44 हजार 805 मुर्तींचे विसर्जन करण्यात आले. तर घरीच विसर्जनासाठी 98 टन अमोनियम बायकार्बोनेट पुणेकरांनी घेत घरीच गणेशमूर्ती विसर्जन केले.
मागील वर्षी गणेशोत्सवानंतर शहरात करोनाची पहिली लाट वेगाने वाढली होती. त्यामुळे यंदा खबरदारी घेत महापालिकेने स्थिर विसर्जन हौद न ठेवण्याचा निर्णय घेतला होता. तसेच नदी तसेच कालव्याच्या ठिकाणचे सर्व विसर्जन घाट बंद ठेवण्याचा निर्णय घेतला होता.
दुसऱ्या बाजूला 277 केंद्रांवर 98 हजार किलो अमोनियम बायकार्बोनेट वितरित करण्यात आले होते. शिवाय फिरत्या हौदांची सोय करताना घनकचरा व्यवस्थापन विभाग-60, नगरसेवकांनी उपलब्ध केलेले 84 आणि 73 क्षेत्रिय कार्यालय पातळीवरील 217 असे फिरते हौद उपलब्ध करण्यात आले होते.
करोनाच्या संकटकाळी आपण सर्वांनी केलेल्या संकल्पानुसार यंदाचा गणेशोत्सव साधेपणाने साजरा केला. यंदाचा उत्सव धार्मिक आणि पारंपारिक पद्धतीने, मंगलमय वातावरणात आणि सामाजिक भान जपत सर्वांनी साजरा केला. यासाठी सर्व पुणेकर आणि गणेशोत्सव मंडळांनी मनस्वी साथ दिली. सर्वच पुणेकर तसेच सार्वजनिक गणेशोत्सव मंडळे, पोलीस आणि महापालिका प्रशासनाचे आभार मानण्याऐवजी मनःपूर्वक धन्यवाद व्यक्त करतो.
– मुरलीधर मोहोळ, महापौर