पुणे(प्रतिनिधी) – जगभरात थैमान घातलेल्या करोनाचा पुण्यातही प्रसार वाढला आहे. या साथीला रोखण्यासाठी महापालिका प्रशासनाकडून सुरू असलेल्या लढाईला मदतीचा हातभार लावत पुण्यातील प्रितम ग्रुपने सामाजिक बांधिलकी जपली आहे. ग्रुपचे संचालक प्रितम गंजेवार व गजानन गंजेवार यांच्या वतीने महानगरपालिकेच्या अधिकारी, कर्मचाऱ्यांच्या सुरक्षेसाठी दहा हजार मास्क देण्यात आले आहेत. महापौर मुरलीधर मोहोळ यांच्याकडे हे साहित्य नुकतेच हस्तांतरित करण्यात आले.
या शिवाय, ग्रुपच्या वतीने आतापर्यंत खासगी तसेच शासकीय डॉक्टर, पोलीस अधिकारी, ट्रॅफिक पोलीस, गरजू नागरिक, सुरक्षारक्षक, इतर विविध कर्मचाऱ्यांच्या सुरक्षेसाठी एकूण 51,000 मास्क व सॅनिटायझरचेही वाटप करण्यात आले. केवळ करोना योद्ध्यांनांच नाही, तर लॉकडाऊनमध्ये हाताला काम नसलेल्या मजुरांची उपासमार लक्षात घेऊन प्रितम गंजेवार तसेच गजानन गंजेवार यांनी आपल्या वाढदिवसाचा खर्च टाळत पुणे आणि नांदेड तसेच इतर ठिकाणच्या तब्बल 1,100 कुटुंबांना जीवनावश्यक वस्तूंचे कीट तसेच जेवणाच्या डब्बे देत अनोखा आदर्श घालून दिला आहे.
देशावर आलेल्या संकटाच्या काळात प्रत्येकाने आपल्या पध्दतीने प्रशासन तसेच गरजूंना मदत करणे आवश्यक असून प्रत्येकाने त्यासाठी पुढे यावे, असे आवाहन ग्रुपचे संचालक प्रितम गंजेवार यांनी केले आहे. तसेच या पुढेही ग्रुपच्या वतीने गरजूंना आवश्यक असलेली मदत अविरतपणे सुरू ठेवण्यात येणार असल्याचे ते म्हणाले. तसेच या गंभीर संकटात नागरिकांनी आनावश्यकपणे बाहेर न पडता घरातच थांबून कुटुंबीयांची काळजी घ्यावी. तसेच पालिका आणि पोलीस प्रशासनास सहकार्य करावे, असे आवाहन त्यांनी केले आहे.