सुरतमधील केमिकल इंजिनियर तरुणीचा अभिनव उपक्रम
सुरत : गेल्या काही वर्षांत स्टार्ट अप उद्योगांना सरकारने प्रोत्साहन दिल्यानंतर तरुणांच्या मनात विविध कल्पना आकारत आहेत. याचे उत्तम उदाहरण सुरतमध्ये समोर आले आहे. सुरत मधील एका केमिकल इंजिनिअर तरुणीने मंदिराबाहेर सापडणाऱ्या फुलांचा निर्माल्यापासून सुगंधी साबण आणि सुगंधी स्प्रे तयार करण्याचा अभिनव उद्योग सुरू केला असून तिला या उद्योगात चांगले यश मिळत आहे.
मैत्री जरीवाला असे या तरुणीचे नाव असून गेल्या वर्षापासून ती हा उद्योग करत आहे. या अभिनव उद्योगाच्या माध्यमातून दरमहा सुमारे दीड ते दोन लाखाचे उत्पन्न मिळवत आहे. सकाळ होताच मैत्री जारीवाला घराबाहेर पडते आणि शहरातील सर्व मंदिराच्या बाहेर आढळणाऱ्या फुलांचे निर्माल्य गोळा करते त्या निर्माल्यावर योग्य प्रक्रिया करून त्यापासून विविध प्रकारची उत्पादने बनवली जातात. निर्माल्यवर प्रक्रिया करून साबण उदबत्ती स्प्रे आणि कंपोस्ट खत अशी विविध प्रकारची दहा उत्पादने मैत्री जरीवाला उत्पादित करते.
उत्पादनाची ही प्रक्रिया मैत्री सध्या आपल्या घरीच करते आणि या निमित्ताने तिने 9 लोकांना रोजगारही दिला आहे. बावीस वर्षांची मैत्री जरीवाला महाविद्यालयीन शिक्षण घेत असतानाच कचरा व्यवस्थापन या विषयावर काम करत होती. त्या विषयाचा अभ्यास करत असतानाच तिला फुलांच्या निर्माल्यापासून विविध प्रकारची उत्पादने करण्याची कल्पना सुचली आणि तिने ती अमलात आणली.
77000 रुपयांच्या भांडवलावर हा आपला उद्योग सुरु केला. सोशल मीडियाच्या माध्यमातून तिने आपल्या प्रोडक्टची मार्केटिंग सुरू केले असून तिला भारतभरातून चांगला प्रतिसाद मिळत आहे. दर महिन्याला दीड लाख पेक्षा जास्त कमाई ती करत आहे.