क्रूड महागले : वाहतूक खर्च वाढल्यास महागाई वाढणार
पुणे – अगोदरच महागाई वाढली असताना इराण आणि अमेरिकेदरम्यानचा तणाव वाढल्यामुळे क्रूडचे दर आता 5 महिन्यांच्या उच्चांकावर गेले आहेत. त्यामुळे आगामी काळात भारतामध्ये पेट्रोल आणि डिझेलसाठी जास्त पैसे मोजावे लागण्याची शक्यता आहे. तसे झाले तर एकूणच महागाई वाढेल आणि सर्वसामान्यांना त्याची झळ बसणार आहे.
इराकमधील अमेरिकेच्या काही तळांवर इराणने दोन डझन क्षेपणास्त्र टाकल्यानंतर जागतिक शेअर बाजार, चलन बाजार आणि इंधन बाजारावर याचा परिणाम झाला. त्यामुळे सकाळी जागतिक बाजारात क्रूडचे दर 5 महिन्यांच्या उच्चांकावर जाऊन 71 डॉलर प्रति पिंपावर गेले. भारतात इंधनाच्या किंमती जागतिक किंमतीच्या आधारावर दररोज ठरविल्या जातात. सध्या भारतातील विविध शहरात पेट्रोलचे दर 75 ते 80 रुपये प्रति लिटर तर, डिझेलचे दर 68 ते 72 रुपये प्रतिलिटर आहेत.
क्रूडचे दर आणखी वाढल्यास भारतातील इंधनाच्या दरातही वाढ होते. इंधनाचे दर वाढल्यानंतर वाहतुकीचा खर्च वाढून महागाई वाढते. त्यामुळे भारतातील जनतेच्या दृष्टिकोनातून हा चिंतेचा विषय ठरू शकतो. 3 जानेवारी रोजी ही इराणच्या एका कमांडरची इराकमध्ये अमेरीकेकडून हत्या केली होती.
तेव्हापासून इराण आणि अमेरिकेदरम्यान तणाव वाढला आहे. नंतर आलेल्या माहितीनुसार, क्षेपणास्त्र हल्ला झाला असला तरी त्यामुळे इराकमधील तेल विहिरींचे नुकसान झालेले नाही. त्यामुळे क्रूडची दरवाढ जास्त झाली नाही. मात्र, अमेरिका आणि इराण या दोघांनी परस्परांना धमक्या दिल्यामुळे आगामी काळात काय होईल, याकडे सर्व बाजारांचे लक्ष लागले आहे.
…तर अर्थव्यवस्थेवर होणार परिणाम
भारतामध्ये अगोदरच महागाईचा दर वाढला असल्यामुळे रिझर्व्ह बॅंकेने डिसेंबरमधील पतधोरणावेळी व्याजदरात कपात केली नाही. क्रूडचे दर वाढले आणि महागाई वाढली तर आगामी काळातही व्याजदर कपातीची शक्यता कमी होईल. त्यामुळे कर्जाचा उठाव कमी होऊन त्याचा अर्थव्यवस्थेवर परिणाम संभवतो. अगोदरच भारत सरकार विकास दर वाढविण्यासाठी प्रयत्न करीत असताना हा नवीन प्रश्न निर्माण झाला आहे.