पुणे – पोटच्या तेरा वर्षीय मुलीशी अश्लील चाळे करणाऱ्या 46 वर्षीय नराधम पित्याला पाच वर्षे सक्तमजुरी आणि तीन हजार रुपये दंडाची शिक्षा विशेष न्यायाधीश जी.पी. आगरवाल यांनी सुनावली. दंड न भरल्यास एक महिना अतिरिक्त कारावास भोगावा लागेल, असे न्यायालयाने आदेशात म्हटले आहे.
कोथरूड पोलीस स्टेशनच्या हद्दीत हा प्रकार घडला. 14 जून 2014 आणि त्यापूर्वीच्या तीन महिन्याच्या कालावधीत ही घटना घडली. या प्रकरणात सरकारी पक्षातर्फे अतिरिक्त सरकारी वकील सुनील मोरे यांनी काम पाहिले. त्यांनी तीन साक्षीदार तपासले.
याबाबत पीडितेच्या आईने म्हणजेच आरोपीच्या पत्नीने पोलिसात फिर्याद दिली आहे. त्या कुटुबात दोन मुली आणि एक मुलगा आहे. पीडित सर्वात लहान आहे. पीडित, आई आणि वडील तिघे एका खोलीत राहत असत. रात्री झोपेत आणि आई नसल्याचे पाहून तो पीडितेसोबत अश्लील चाळे करत असत. तिला घरीच थांब असे म्हणत असत.
फिर्यादीला तीन महिन्यापासून वडिलांचा मुलीसोबत वागण्यातील वेगळेपण जाणवला. त्यावेळी विश्वासात घेऊन तिने पीडितेला याबाबत विचारणा केली. यावेळी घडलेला प्रकार समोर आला. फिर्यादीने पोलिसात फिर्याद दिली. पोलिसांनी तपास करून न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले. यावर सुनावणी करत न्यायालयाने शिक्षा सुनावली.