….म्हणून उदयनराजे भोसलेंनी मानले योगी आदित्यनाथ यांचे आभार

मुंबई : भाजपा खासदार उदयनराजे भोसले यांनी उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांचे आभार मानले आहेत. योगी आदित्यनाथ यांनी नुकतेच आग्रा येथे बांधण्यात येणाऱ्या संग्रहालयाला मुघलांचे नाही तर छत्रपती शिवाजी महाराजांचे नाव दिल्याची घोषणा केली आहे. यानिमित्ताने उदयनराजे भोसले यांनी ट्विट करत योगी आदित्यनाथ यांचे आभार मानले आहेत. मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांचे मनापासून अभिनंदन असे योगी आदित्यनाथ यांनी म्हटले आहे.

उदयनराजे भोसले यांनी ट्विटमध्ये लिहिले आहे की, ‘छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वातंत्र्याचा पहिला हुंकार दिला तो आग्य्रातल्या औरंगजेबाच्या दरबारातून. महाराजांनी याच दरबारातल्या अपमानाचा बदला घेवून अखंड हिंदुस्तानावर राज्य केले. त्यांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या आग्रा नगरीत ‘छत्रपती शिवाजी महाराज संग्रहालय’ स्थापनेचा ऐतिहासिक निर्णय हा संपूर्ण देशाला अभिमानास्पद आहे. मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच मनापासून अभिनंदन”.

योगी आदित्यनाथ यांनी सोमवारी ट्विट करत सांगितले होते की, “गुलामीची मानसिकता असलेल्या प्रतीक चिन्हांना नव्या उत्तर प्रदेशात काहीही स्थान नाही. आपल्या सगळ्यांचे नायक छत्रपती शिवाजी महाराज आहेत. त्यामुळेच आता आग्रा येथे बांधण्यात येणारं हे संग्रहालय छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावाने ओळखलं जाईल”.

आग्रा येथील ताजमहाल या वास्तूजवळ मुघल संग्रहालयाचं बांधकाम सुरु आहे. उत्तर प्रदेशात समाजवादी पक्षाचं सरकार होतं तेव्हाच या संग्रहालयाचं बांधकाम सुरु करण्यात आलं होतं. त्यानंतर या संग्रहालयाचं नाव बदलण्याची चर्चा सुरु होती. आता उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी या संग्रहालयाला छत्रपती शिवाजी महाराजांचे नाव दिलं गेल्याची महत्त्वाची घोषणा योगी आदित्यनाथ यांनी केली आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.